ऋषीतुल्य नेतृत्व शेणफडराव घुबे यांचा रविवारी एकाहत्तरीनिमित्त बुलढाण्यात अभीष्टचिंतन सोहळा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खेड्यापाड्यात वसलेल्या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी तब्बल ३२ वर्षे संघर्ष केल्यानंतर भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणारे शिक्षणमहर्षी, शेती व शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभा करणारे शेतकरी नेते, तथा राजकीय व्यासपीठावर उपेक्षित, वंचितांच्या वेदना मांडणारे जाणकार राजकीय नेतृत्व शेणफडराव घुबे पाटील यांच्या एकाहत्तरीनिमित्त ज्याला वैदिक शास्त्रांत ‘भीमरथशांती’ सोहळा असेही म्हणतात, असा अभीष्टचिंतन सोहळा बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी सभागृहात दि.१ सप्टेंबर, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, शेणफडराव घुबे (दादा) यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला जाण्यासह त्यांचे अभीष्टचिंतनही केले जाणार आहे.
देऊळगावघुबे, ता. चिखली या छोट्याशा खेड्यातून भारत शिक्षण प्रसारक मंडळाची ३२ वर्षांपूर्वी स्थापना करून या शैक्षणिक संकुलाचे शेणफडराव घुबे (दादा) यांनी छोटेशे रोपटे लावले होते. या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. त्यांनी केवळ शैक्षणिकच नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही अनेक आदर्श प्रस्थापित केलेले आहे. शेती, सहकार, राजकारण या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे काम उभे केले, जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्यांनी मार्गदर्शन तर केलेच, पण अनेकांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटाही आहे. अशा या ऋषीतुल्य शेणफडराव घुबे यांच्या एकाहत्तरीनिमित्तच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे रविवारी (दि.१ सप्टेंबर) रोजी सहकार, पत्रकारिता, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या वैचारिक गोतवळ्यातील मान्यवरांच्यावतीने आयोजन करण्यात आलेले आहे. या आयोजन समितीत डॉ. पुरूषोत्तम देवकर, गजानन शिंदे, अॅड. जयसिंहराजे देशमुख, विजयसिंह राजपूत, ज्येष्ठ पत्रकार व संपादक रणजितसिंह राजपूत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पेन्शर्न्स फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष पी. डी. सपकाळ, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दीपक लद्धड, बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ, सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण, तसेच जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण गिते यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या सभागृहात आयोजित या अभीष्टचिंतन सोहळ्याला सर्वांनी आवर्जुन हजर राहावे, असे आव्हान आयोजकांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
———-