विधानसभेसाठी मनोज कायंदे यांना सिंदखेडराजातून उमेदवारी द्या!
– शरद पवार सिंदखेडराजा मतदारसंघ काँग्रेसला सोडतील का?
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – काँग्रेसचे निष्ठावंत नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोज देवानंद कायंदे यांना विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. काँग्रेसचे निष्ठावंत नेते जुने अली व कार्यकर्त्यांनी या संदर्भात नुकतीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांची दिल्लीत भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. महाआघाडीत सिंदखेडराजा-देऊळगावराजा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडे असून, येथून शरद पवार यांनी कु. गायत्री शिंगणे यांना कामाला लागण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शरद पवार हा मतदारसंघ काँग्रेसला सोडतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्ते जुनेद अली व कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व मुकूल वासनिक यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितले, की मनोज देवानंद कायंदे हे नाव मतदारसंघाला सर्वदूर परिचीत आहे. सिंदखेडराजा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेला युवा चेहरा म्हणजे मनोज देवानंद कायंदे होय. ते सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी अनेक आंदोलने केली आहे. कित्येकवेळा सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस हा विचाराचा पक्ष आहे हे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्यावतीने त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अहोरात्र झटणारा खंदा शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. शहरांमध्ये व त्याचबरोबर ग्रामीण भागात मनोज कायंदे हे सर्वत्र फिरत असतात. प्रत्येकाच्या हाकेला धावणारा जनसामांन्य कार्यकर्ता आहे, व सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा युवा चेहरा आहे. त्याचबरोबर त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय क्षेत्रात मोठी पकड आहे. याच अनुषंगाने त्यांना सिंदखेडराजा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाकडून त्यांना संधी मिळावी म्हणून काँग्रेसनेते जुनेद अली यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्ली येथे भेट घेतली.
मनोज देवानंद कायंदे यांच्या नावाची शिफारस बुलढाणा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. तसे बघितले तर महाराष्ट्रात फोडाफोडीचे आणि पैशाच्या जोरावर राजकारण चालू आहे. परंतु हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेला धरुन चालणारा आहे. इथे निष्ठेला किंमत देणारा मतदार वर्ग आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये पूर्वाश्रमीचे सर्व उमेदवार आहेत, त्यामध्ये सध्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि तोताराम कायदे माजी आमदार, व या अगोदर आमदारकीची निवडणूक लढवलेले विनोद लक्ष्मण वाघ हेदेखील महायुतीतच आहे. त्यामुळे सर्व लढणारे उमेदवार महायुतीत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची गोची निर्माण झालेली आहे. अद्याप एवढे तरी स्पष्ट दिसत आहे. अन्यथा त्यांना निवडणूक लढवायची असल्यास युतीधर्म मोडावा लागेल. परंतु महाविकास आघाडीकडे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी पाहिजे तसा मातब्बर उमेदवार दिसून येत नाही. त्यामध्ये युवा संपूर्ण जिल्ह्याला परिचय असलेल्या जिल्हा परिषद सदस्य व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज देवानंद कायंदे हे नवखे जरी असले तरी ते महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला आवाहन देऊ शकतात, हे मात्र खरे आहे. त्यामुळे तळागाळातून मनोज कायंदे यांच्या नावाची मागणी होत आहे, असेही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात आलेले आहे.