बुलढाणा/खंडाळा म.(संजय निकाळजे) – स्मशानभूमीच्या रिकाम्या जागेची सातबारा नोंद असतानासुद्धा टीन शेड बांधण्यासाठी जमीन देणाराचे वारस मज्जाव करीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मयतावर चिखली येथील स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. म्हणजे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही खंडाळा मकरध्वज हे गाव स्मशानभूमीविनाच आहे. त्यामुळे आता एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार थेट तहसील कार्यालयातच करण्याचा पवित्रा खंडाळावासीयांनी घेतला आहे.
चिखली शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर खंडाळा मकरध्वज गाव आहे. मात्र या गावाला पक्की स्मशानभूमीच नाही. खंडाळा शिवारातील गट नंबर ६१५ मधील तहसीलदार चिखली यांचे फाईलवरील केस रा.भा.भ.आर.टी.एस ६७/खंडाळा मकरध्वज/२/१९८१-८२ आदेशावरून गट नंबर ६१५ यातील ४ आर जमीन बौद्ध स्मशानभूमीकरिता वरील आदेशाने देण्यात आली व त्याची दुरुस्ती १ सप्टेंबर १९९२ रोजी तहसीलदार यांचे स्वाक्षरीने करण्यात आली, मात्र अद्याप त्या ठिकाणी टीन शेड नाही. सदर जागेवर टीन शेड बांधण्यासाठी स्मशानभूमीसाठी सातबारावर नोंद करून जागा देणार्या मयत व्यक्तीचे वारस विरोध करीत आहेत. पावसाळ्यात प्रेत जाळण्यासाठी टीन शेडची व्यवस्था नसल्याने एक दीड वर्षांपूर्वी सुनीता दामोदर साळवे, दोन-तीन महिन्यापूर्वी दिनकर चिंताजी साळवे तसेच एक महिन्यापूर्वी द्रौपदाबाई शंकर भिसे या तीनही मयतांचे प्रेत चिखली येथील स्मशानभूमीत नेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. या संदर्भात गावकर्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्याकडे चकरा मारून लेखी व तोंडी हा विषय कथन केला. मात्र त्यांच्याकडून आश्वासनाशिवाय दुसरे काहीही पदरी पडले नाही. त्यामुळे २८ ऑगस्टरोजी नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले. तेथे सातबारा, माजी आ.राहुल बोंद्रे यांचे पत्र, ठरावाची प्रत, निवेदन तहसीलदार चिखली यांचेसह जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, आमदार यांना देऊन यापुढे गावात मयत झाल्यास प्रेत थेट तहसील कार्यालयासमोर आणून दहन करण्यात येईल, असा इशारा देऊन टाकला.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तसेच दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी तहसीलदार यांच्यावर राहील. त्यामुळे सातबारावर नोंद असलेली संबंधित स्मशानभूमीची जागा मोजून देऊन प्रेताची होणारी अवहेलना थांबविण्यासाठी त्या ठिकाणी टीन शेड ची व्यवस्था करण्याची मागणी देखील गावकर्यांनी केली आहे. एकंदरीतच स्वातंत्र्याची ७८ वर्ष लोटली असताना सुद्धा तसेच १९८१-८२ मध्ये सातबारावर स्मशानभूमीच्या जागेची नोंद असतानासुद्धा खंडाळा मकरध्वज रहिवाशांना संघर्षमय सामना करावा लागतो. हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल.
आता तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार करू.!
गेल्या ४०-४२ वर्षापासून स्मशानभूमीच्या जागेची नोंद सातबारावर झालेली आहे. जागा देणार्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. मात्र त्याचे वारस टीनशेड बांधण्यासाठी अडवणूक करत आहेत. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या माध्यमातून चार लाखाचा निधीसुद्धा स्मशानभूमी बांधकामासाठी मंजूर झाला होता. मात्र तोसुद्धा या अडथळ्यामुळे उपयोगी पडला नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी याप्रकरणी तोडगा काढणे महत्त्वाचे ठरत आहे. अन्यथा यापुढे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर चिखली तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे नागरिकांनी ठरवले आहे.
– अरुण साळवे /राजेंद्र साळवे, नागरिक, खंडाळा मकरध्वज