ChikhaliHead linesVidharbha

तब्बल चार तासानंतर आंदोलन मागे; शेतकर्‍यांच्या खात्यांचे ‘होल्ड’ हटविले!

– गावपातळीवर पैसे काढण्यासाठीची सुविधा पूर्ववत करण्यासाठी ३ तारखेला जिल्हास्तरीय आढावा बैठक

मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – शेतकर्‍यांच्या खात्याला महाराष्ट्र बँकेने होल्ड लावल्याने शेतकर्‍यांना पैसे काढता येत नव्हते. पैसे काढायचे असल्यास थेट बँकेतच जावे लागत होते. त्यामुळे अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकर्‍यांच्या या समस्येची माहिती घेऊन शेतकरी नेते विनायक सरनाईक व शेतकर्‍यांनी आज (दि.२८) मेरा येथील शाखेत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तब्बल चार तास आंदोलन चालल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बँकेच्या प्रबंधकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर बँकेने शेतकर्‍यांचे होल्ड काढले. गावपातळीवरील व्यवहार सुरू होण्यासाठी दि. ३ सप्टेंबररोजी वरिष्ठस्तरीय बैठक ठेवण्यात आली आहे. याबाबतचे लेखी आश्वासन बँकेने दिल्यानंतर विनायक सरनाईक व शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले. लेखी अश्वासनाची पूर्तता होवून तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन शेतकर्‍यांसह छेडण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर, विनायक सरनाईक व शेतकर्‍यांनी दिलेला आहे.
लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता.

सविस्तर असे, की महाराष्ट्र बँक शाखा मेरा खुर्द यांनी शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड लावले होते. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना बँकेव्यतिरिक्त पैसे काढण्याची सुविधा बंद करण्यात आल्याने गावातील सीएसपी सेंटर व इतर ठिकाणी त्याचप्रमाणे एटीएम, गुगल पे, फोन पे व इतर सुविधांचा वापर करता येत नसल्याने शासकीय योजना व नुकसान भरपाई व इतर रक्कम बँकेत येवूनच काढावी लागत होती. त्यामुळे शेतकर्‍यांसह वयोवृद्ध महिला, पुरुष व लाडक्या बहिंनीना अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर बँकेतच पैसे काढण्यासाठी वाहन खर्चामुळे आर्थिक भुर्दड सोसावा लागत असल्याने सदरची बाब शेतकर्‍यांनी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना सांगितले होते. त्यावर सरनाईक यांच्यासह शेतकर्‍यांनी महाराष्ट्र बँकेत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तर मागण्यांची पूर्तता करा, शेतकर्‍यांची हेळसांड थांबवा, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा प्रबंधक, जिल्हा प्रशासन, त्याचप्रमाणे बँकेचे रिजनल मॅनेजर सुरूशे, विभागीय व्यवस्थापक पुणे यांच्याशी चर्चा करीत मध्यस्थी केली. या चर्चेनंतर शेतकर्‍यांचे खात्याचे होल्ड काढण्यात आले असून, शेतकर्‍यांना शासकीय अनुदानास होल्ड लावण्यात येणार नाही, तर गावपातळीवर पूर्वीप्रमाणे शेतकर्‍यांना पैसे काढण्यासाठीची सुविधा सुरळीत करण्यात येईल. शेतकरी व ग्राहकांची हेळसांड थांबविण्यासाठी व्यवहार सीएसपी सेंटर व इतर ठिकाणी पूर्ण करण्यासाठी दि. ३ सप्टेंबररोजी बुलढाणा येथे जिल्हास्तरीय बॅकर आढावा मिटींग आयोजित करून मागण्यांच्या अनुषंघाने तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन बँकेचे व्यवस्थापक यांनी दिले आहे.रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा आणल्या आहेत. आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाइन आधार पेमेंट एटीएम सुविधा सुरू केली आहे. त्याच्या मदतीने ग्राहकांना घरबसल्या रोख रक्कम मिळू शकते, त्यांना बँकेत किंवा जवळच्या एटीएमवर जाण्याची गरज नाही. ही पेमेंट सेवा पूर्णपणे आधार प्रणालीवर आधारित आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती बायोमेट्रिक्स वापरून व्यवहार करून खात्यातील पैसे काढू शकत होती. यासाठी शेतकर्‍यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यात आले. यामुळे सर्वच बँका ग्राहकांना गुगल पे, फोन पे, एटीएम यासह इतर पध्दतीने बँकेचे व्यवहार करता येणे सुलभ झाले होते. असे असतांना शेतकर्‍यांचे गावात पैसे निघत नसल्याने बँकांमध्ये मोठी गर्दी होत होती. तसेच, या गैरसोयीचा शेतकर्‍यांना, वयोवृद्धांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. परंतु, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मध्यस्थीनंतर शेतकर्‍यांची गावपातळीवरील व्यवहार पूर्ण करण्याची मागणी पूर्णत्वास जाणार असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


वयोवृद्धांना गावातच मिळणार पैसे, बँकेचे लेखी आश्वासन!

आधार बेस पैसे काढले जात नसल्याने, वयोवृद्धांना मेरा येथे यावे लागत होते. या शाखेकडे असलेल्या २२ गावातील ग्राहकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु सदरील अडचण सिस्टीमची असल्याने तात्काळ सोडवणे शक्य नव्हते. तोडगा निघेपर्यंत वयोवृद्धांचे पैसे गावात जात प्रक्रिया पूर्ण करून त्यांना दिले जातील, असे आश्वासन बँकेकडून देण्यात आले असल्याने वयोवृद्धांची हेळसांड थांबणार आहे. तसेच, महाराष्ट्र बँकेत त्यांना ताटकळत रांगेत उभे रहावे लागणार नाही. दरम्यान, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी महिला, वयोवृद्ध ग्रामस्थ व शेतकरी यांची मोठी आर्थिक समस्या सोडविल्याने शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!