LONARVidharbha

मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेत जनजागृती!

– मुलींना शिकवला ‘गूड टच, बॅड टच’; तर शिक्षकांना दिली कायद्याची माहिती

बिबी (ऋषी दंदाले) – महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारी व छेडखानीच्या प्रकरणांमुळे समाजमन अस्वस्थ असताना, असे प्रकार आपल्या हद्दीत घडू नये, यासाठी बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या शाळा, महाविद्यालयांत जाऊन शिक्षक, मुख्याध्यापकांना कायद्याचे धडे दिले. तसेच ‘गूड टच, बॅड टच’, महिलांविषयी कायदा, पोस्को कायद्याबाबत शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले.

सध्या महाराष्ट्रातील काही ठिकाणी शालेय बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या काही घटना उघडकीस आल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये जागृती करणे, विद्यार्थिनींवर अत्याचार होऊ नये याकरिता उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथे जाऊन तेथील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांना गूड टच व बॅड टच यासंदर्भात मार्गदर्शन केले. पोक्सो कायदाबाबत माहिती देण्यात आली. शाळेतील प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक यांना विद्यार्थ्यांची घ्यावयाची खबरदारी याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. बदलापूर, मुंबईसारखी घटना घडू नये, याबाबत मार्गदर्शन केले. शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गोपनीय तक्रार करता यावी, याकरिता शाळेत तक्रारपेटी ठेवण्याबाबत, पोलीस मदतीकरिता ११२ नंबरवर संपर्क करण्याबाबत मुला, मुलींकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र व बंदिस्त वॉशरूमची व्यवस्था, वर्गात परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शाळेत शाळेच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्ती आल्यास त्याची चौकशी करावी. आपल्या शाळेच्या रेकॉर्डवरून, विद्यार्थ्यांकडून व त्याचे आई-वडिलांकडून संबंधित व्यक्तीची खात्री करावी. तसेच त्यांचे शाळेतील बाहेर गावाचे विद्यार्थ्यांना ने-आण करणारे चालक तसेच गाड्यांमधील इतर कर्मचारी तसेच शाळेतील सफाई कर्मचारी यांचे चरित्र पडताळणी अहवाल बनवून घेण्याबाबत सूचना दिल्या. बालक (मुलगा/मुलगी) सोबत एखादी चुकीची घटना घडल्यास किंवा एखादा व्यक्ती वारंवार आपल्याशी नको असलेली जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्यास अन्य मार्गाने आपल्याला त्रास देत असल्यास बालकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा शिक्षक, पोलीस यांना त्वरित कळवावे. तसेच सहकार विद्यालय बिबी येथेदेखील महिला अंमलदार दीपमाला पुरंदरे यांनी मुलींना स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले. व ठाणेदार यांनी स्कुल बसचे चालक यांना सूचना दिल्या. शेवटी महाविद्यालयीन जीवनाचे विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग हा चांगला करून घेण्याचे आवाहन केले आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!