उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर महाआघाडीकडून उद्याचा बंद मागे!
– निर्णय मान्य नाही; पण न्यायालयाचा आदर करून बंद मागे घेत आहोत : उद्धव ठाकरे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – बदलापूर येथे शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ व राज्यात महिला व मुलींवर वाढलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या म्हणजेच २४ ऑगस्टरोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. या बंदच्याविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काही वकील तडकाफडकी उच्च न्यायालयात गेले असता, त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेत, मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने सांगत, असा बंद पुकारला गेला तर राज्य सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार व काँग्रेसच्यावतीने उद्याच्या बंदमधून माघार घोषित करण्यात आली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षानेही बंदमधून माघार घोषित करत, शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलनाची घोषणा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सहवेदना आंदोलन करणार आहेत.
शिवसेना (ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात या बंदची हाक दिली होती. या बंदच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काही वकिलांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेतली. या याचिकांवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने उद्याचा बंद बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. राज्यात कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. त्यानंतरही कुणी बंद पुकारण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने या प्रकरणी स्पष्ट केले. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक युक्तिवाद केला. ते म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवरही कारवाई झाली आहे. राज्य सरकारनेही या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. मग उद्याच्या बंदची काय गरज आहे? सदावर्ते यांनी आपल्या युक्तिवादात बदलापूर रेल्वेस्थानकात झालेल्या दगडफेकीची काही फोटोही कोर्टापुढे सादर केले. तसेच या घटनेचे समर्थन कसे करणार? असा सवालही उपस्थित केला. तर दुसरे वकील सुभाष झा म्हणाले की, उद्याच्या महाराष्ट्र बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होईल. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार हायकोर्टाला आहे. भीमा कोरेगाव व इतर मुद्यांवर झालेल्या बंदमुळे प्रशासन व्यवस्था ठप्प झाली होती. त्याचा राज्यासह बाहेरून येणार्या नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे सरकार उद्याचा बंद रोखणार नसेल तर कोर्टाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. उद्याच्या बंदमध्ये राज्यातील विरोधी पक्षांनी लोकल, बससेवा व रस्ते बंद करण्याचे नियोजन केले आहे. विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाही. यामुळे शाळा, महाविद्यालय व रुग्णालयांना मोठा फटका बसेल. तसेच राज्याचा एका दिवसाचा कितीतरी मोठा महसुलही बुडेल. हा सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने उद्याचा बंद बेकायदेशीर ठरवत, राज्य सरकारला कारवाईचे आदेश दिलेत.
बंद नाही आंदोलन करणार – उद्धव ठाकरे
न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. पण, उच्च न्यायालयाने बंदबाबत जितक्या तत्परतेने निर्णय घेतला, तितक्याच तत्परतेने गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, अशी मागणीपर विनंती उद्धव ठाकरेंनी न्यायालयाकडे केली आहे. तसेच, आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, मी स्वत: सकाळी 11 वाजता शिवसेना भवनातील चौकात काळी फीत बांधून आंदोलनात बसणार आहे. राज्यभरात मविआचे कार्यकर्ते तोंडाला काळी फीत बांधून राज्यभर आंदोलन करतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, आंदोलन करण्याचा अधिकार राहिला की नाही, असेही ठाकरेंनी म्हटले.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. तसेच, शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या बंदबाबत भूमिका जाहीर करत, आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच, उद्या सकाळी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून सकाळी १० ते ११ या वेळेत सहवेदना व्यक्त करण्यात येणार आहेत. येथे एक तास बसून बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यात येईल, असे पवारांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंदबाबत भूमिका जाहीर करत, बंदऐवजी एक तासभर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भूमिका मांडत, उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. अशी तत्परता कोर्टाने आरोपींना शिक्षा देण्यासाठीही वापरावी, असा टोलाही त्यांनी उच्च न्यायालयाला हाणला. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका जाहीर करताना म्हटले की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (24 ऑगस्ट) राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी, समाजातील सर्वस्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येते, असे ट्विट शरद पवार यांनी बंदबाबत केले आहे. त्यामुळे, उद्याचा बंद मागे घेत असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले.
बदलापूर येथील एका शाळेत ४ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. तसेच, राज्यांत महिला व बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना उघड होत आहेत. राज्यात महिला व मुली असुरक्षित झाल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने उद्या, दि. २४ ऑगस्टरोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. परंतु, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाआघाडीने आपला बंद मागे घेतला असून, त्याऐवजी शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन केले जाणार आहे.
————-