Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना जामीन मंजूर

– तुपकरांना ताब्यात घेतल्यानंतरही शेतकर्‍यांनी केले गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन
– लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची रविकांत तुपकर यांची घोषणा!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनासाठी जात असतांना त्यांना मरिन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी अटक केली. तुपकरांना अटक जरी केली असली तरीही, शेतकर्‍यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून आंदोलन केलेच. तुपकरांना अटक केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना किल्ला कोर्टात हजर केले. तेथे दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुपकरांसह त्यांच्या साथीदारांना सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचे तुपकरांनी जाहीर केले आहे. दरम्यान, तुपकरांचे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरील आंदोलन मोडित काढण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याने तुपकरांना पुढील आंदोलनाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० ऑगस्टरोजी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकर्‍यांना घेऊन २३ ऑगस्टरोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ‘शेतकरी आत्महत्या कसे करतात याचे प्रात्यक्षिक दाखवून’ आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. बुलढाणा पोलिसांनी या इशार्‍याची गांभीर्याने दखल घेत, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, दि. २१ ऑगस्टरोजी कलम १६८ नुसार रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली होती. परंतु आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली होती. त्यानुसार रविकांत तुपकर पोलिसांना चकमा देत, मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो तर पकडले जाऊ, त्यामुळे काही कार्यकर्ते व शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील असे नियोजन तुपकारांचे होते. तर दुसरीकडे, मुंबईत येणार्‍या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकमा देऊन ठरलेल्या नियोजनानुसार रविकांत तुपकर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाकडे निघाले होते.

परंतु मरिन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले. यावेळी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यादेखील तेथे होत्या. तुपकरांना जरी ताब्यात घेतले तरी शेतकर्‍यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे तणावाचे चित्र निर्माण झाले होते. पोलिसांनी रविकांत तुपकरांना आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे ठेवले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. पोलिस व तुपकर यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आंदोलन करून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नका, असे आम्ही त्यांना जबावले होते. तरीही त्यांनी आमचे एकले नाही, असे पोलिसांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तर शेतकरीहितासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत आहोत, अशी बाजू तुपकरांच्यावतीने मांडण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकून न्यायालयाने तुपकरांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान, जोपर्यंत शेतकरी बांधवांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
————–

जरांगे पाटलांचीही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनाची घोषणा

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनापाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे. 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!