Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPolitics

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसा करतो, याचे प्रात्यक्षिक दाखवणारे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, तुपकर यांच्या पाळतीवरही मोठ्या प्रमाणात गुप्तचर पोलिस होते. ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांना अटक केली. दरम्यान, काही शेतकर्‍यांनी पोलिसांना गुंगारा देत ‘वर्षा’ बंगल्याऐवजी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले. पोलिसांनी शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची सूचना केली आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांवरून आक्रमक झालेले असून, राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांना दरवाढ देण्यात यावी, यासाठी त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते शुक्रवारी सकाळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पण तत्पूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना चर्चगेट येथून त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले. यावेळी तुपकर यांनी पोलिसांची ही कृती सरकारला महागात पडेल, असा इशारा दिला. मरीन लाईन्स पोलिसांनी मला ताब्यात घेतले आहे. आता ते कुठे नेतात हे पाहू. तूर्त ही कारवाई सरकारला महागात पडेल यात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले होते.
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता. रविकांत तुपकर यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारने सोयाबीनला ९ हजार, तर कापसाला १२ हजार रुपये दर द्यावा. तसेच शेतकरी कर्जमाफी पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यांत जमा करावी, असे ते म्हणाले होते. पोलिसांनी त्यांना सध्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात हलविले असून, त्यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
पोलिसांनी अटक केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. सरकारने आज मला बेकायदेशीरपणे अटक केली. सरकार आमच्या चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. येथे इंग्रजांचे राज्य नाही. ही लोकशाही आहे ही बाब मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. तुम्ही मला अटक केली हरकत नाही. मला कुठेही न्या. पण मी जेव्हा बाहेर येईल, तेव्हा महाराष्ट्रातील सगळा शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसल्याशिवाय राहणार नाही, असे रविकांत तुपकर पोलिसांनी अटक केल्यानंतर सरकारला इशारा देत म्हणाले.


दरम्यान, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तुपकर यांना अटक केल्यानंतर पोलिस त्यांना किल्ला कोर्टात हजर करणार आहेत. तेथे कोर्ट तुपकरांना जामीन देते की जेलमध्ये पाठवते, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, तुपकरांना अटक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मरिन ड्राईव्ह चौपाटीवर आंदोलन सुरू केले होते. तसेच, आझाद मैदानावरही राज्यभरातून आलेल्या शेतकर्‍यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले असता, आझाद मैदान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.


दरम्यान, आज जरी तुम्ही मला बेकायदेशीररित्या अटक केली असली तरी, जेव्हा मी बाहेर येईल, तेव्हा सगळा शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

गिरगाव चौपाटी येथे झालेले आंदाेलन.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना जामीन मंजूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!