Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

रविकांत तुपकर मुंबईत पोहोचले?; पोलिसांकडून शोधाशोध सुरू!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकर्‍यांना घेऊन मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार तुपकर शेतकर्‍यांसह मुंबईत दाखल झाले असल्याची खात्रीशीर माहिती कानावर आली असून, शेतकरीही वेगवेगळ्या मार्गाने मुंबईत दाखल होत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तुपकरांची शोधाशोध सुरू आहे. कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात शेतकरी कसा आत्महत्या करतो, याचे प्रात्यक्षिक दाखविणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे या आंदोलनात नेमके काय घडते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० ऑगस्टरोजी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकर्‍यांना घेऊन दि. २३ ऑगस्टरोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसे करतात, याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी यापूर्वीदेखील रविकांत तुपकरांनी हजारो शेतकर्‍यांना घेवून थेट मुंबईत धडक देऊन आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या इशार्‍याची गांभीर्याने दखल घेत, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, २१ ऑगस्टरोजी १६८ नुसार रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तर शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून, तुपकर व शेतकर्‍यांची शोधाशोध करीत आहे, तर दुसरीकडे तुपकर मात्र आंदोलनाव ठाम असून, सरकारने आमच्या मागण्याबाबत ठोस निर्णय घ्यावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून, नेमके काय होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.


तुपकर नाशिकमधून निसटले कसे?

दरम्यान, खास सूत्राने दिलेल्या गोपनीय माहितीनुसार, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका कार्यक्रमानिमित्त जात असल्याचे गुप्तचर पोलिसांना माहिती होते, त्यानुसार पोलिसांचे एक पथक तुपकरांवर नजर ठेवून होते. तुपकर हे सिन्नर येथे काल गेले, तेथे कार्यक्रमालाही हजेरी लावली. तेथेदेखील हे पोलिस हजर असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तुपकरांनी काही लोकांच्या भेटीगाठी घेतल्या व नंतर ते अचानक गायब झाल्याने गुप्तचर पोलिसांची मोठी गोची झाल्याचे सांगण्यात येत आहे. तुपकर हे नाशिक किंवा पुण्यातच कुठे तरी असावेत, असा एक अंदाज असून, त्यांचे संपर्क क्रमांक बंद आहेत. तसेच, त्यांच्या जवळच्या लोकांचे लोकेशनही बुलढाणा येथेच दाखवले जात आहे. पोलिसांना गुंगारा देऊन तुपकर मुंबईत पोहोचले असल्याची खात्रीशीर माहिती असली तरी, ते नाशिक किंवा पुण्यातच कुठे तरी असावेत, असा पोलिसांचा दाट संशय असून, पोलिस त्यांच्या मागावर असल्याचे खात्रीशीर सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गेल्या चार दिवसांपासून कडेकोट बंदोबस्त तैनात असून, तेथे तूर्त तरी तुपकरांना आंदोलन करणे शक्य नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तुपकर हे वेशांतर करून येतील, अशी शक्यता पाहाता, पोलिस डोळ्यात तेल घालून काळजी घेत असल्याचेही खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तुपकर हे कोणतेही आंदोलन पत्रकारांशिवाय करत नाहीत, त्यामुळे काही पत्रकारांकडेदेखील पोलिसांनी ‘सेटिंग’ लावली असल्याचे या खात्रीशीर सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

तुपकरांना पोलिसांची नोटीस; ‘आंदोलन थांबवा’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!