लोकसभेत ‘गठ्ठा’ मते घेणार्या तुपकारांची गोची? विधानसभा लढण्यासाठी मतदारसंघ सापडेना!
– तुपकारांमुळेच नरेंद्र खेडेकरांची ‘सीट’ गेल्याचा महाविकास आघाडीला संशय!
– तर, तुपकरांनी स्वबळावर लढणे ही ‘महायुती’ची नितांत गरज!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राजकारणात केव्हा काय होईल, याचा नेम नसतो, शेतकरी नेते रविकांत तुपकरही याला अपवाद कसे ठरतील? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तब्बल २ लाख ५० हजार एवढी गठ्ठा मते घेतली, आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. परंतु याच गठ्ठा मतामुळे महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला, असा दाट संशय बळावल्याने महाविकास आघाडी त्यांना सावलीतही उभे करायला तयार नसल्याची खात्रीशीर माहिती असून, दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील तुपकरांना फारकत दिली आहे. आमच्या नावाचे कुंकू लावू नका, असा इशाराच संघटनेने तुपकरांना दिला आहे, दुसरीकडे तुपकरांनीही शेट्टी यांच्यावर टीकास्त्र डागत लोकसभा निवडणुकीत शेट्टींचे डिपॉझीट जप्त झाल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवून शेट्टींना डिवचले आहे. अशा परिस्थितीत रविकांत तुपकरांना विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधकामी दमछाक होत असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. लोकांनी खात्रीशीरपणे निवडून द्यावे, असा सुरक्षित मतदारसंघ जिल्ह्यात तरी तुपकरांना उरला नसून, त्यामुळे रस्त्यांवरील आंदोलनांमुळे लोकप्रिय झालेल्या या शेतकरी नेत्याची मोठीच राजकीय गोची होऊ बसली आहे. तरीदेखील ते चिखली किंवा सिंदखेडराजातून उभे राहण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती हाती येत आहे. पुणे येथे तुपकरांनी राज्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. परंतु, त्यांच्यासोबत बच्चू कडू किंवा इतर नेत्यांनी सोबत येण्य़ास अद्याप तरी होकार दिलेला नाही. कोणताही नवा भिडू सोबत येत नसल्याने तुपकर हे एकटे पडले असून, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ते काय निर्णय़ घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव व महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर व अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात ‘तिरंगी’ वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात दुहेरी अशीच झाली. तुपकर हे जवळपास एक लाख मतांची पराभूत झाले. यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांचा २९ हजार मतांनी निसटता विजय झाला. खासदार जाधव यांना ३ लाख ४९ हजार, प्रा. नरेंद्र खेडेकर यांना ३ लाख २० हजार तर अपक्ष रविकांत तुपकर यांना २ लाख ५० हजाराचे जवळपास मते मिळाली. यामध्ये रविकांत तुपकरांना मिळालेल्या २ लाख ५० हजार मतांमुळे प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाल्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा संशय आहे. तर ही बाब मात्र तुपकर विविध ठिकाणी बोलताना नाकारत आहेत. उलट माझ्यामुळेच प्रतापराव जाधवांचा मार्जिन कमी झाल्याचे तुपकरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुपकर यांच्याशी जाहीर फारकत घेतली असून, आमच्या नावाचे कुंकू लावू नका, असे तुपकरांना सांगितले आहे. त्याला पुण्यातच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तुपकरांनी चोख प्रत्युत्तर तर दिलेच, पण राजू शेट्टी यांच्यावरही घणाघाती हल्ला चढविला. शेट्टी हे कसे आप्पलपोटे आहेत, विश्वासघातकी आहे, यावर त्यांनी भर दिला होता. अशाही परिस्थितीत रविकांत तुपकर मात्र आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील मेळाव्यातूनच त्यांनी चौथ्या आघाडीची घोषणा करत, राज्यातील २५ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. तुपकरांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत टेन्शन तर महायुतीला मात्र उकळ्या फुटल्या आहेत. कारण, तुपकरांनी प्रत्येक मतदारसंघात १० ते १५ हजार जरी मते खालली तर त्याचा महायुतीला फायदा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकसभेत मिळालेल्या मतांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही जाणकार सांगतात.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, मेहकर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असून, येथून डॉ.राजेंद्र शिंगणे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून रविकांत तुपकर यांना ७४ हजार ७५३ मते मिळाली असून, ३० हजाराचे जवळपास मताधिक्य मिळाल्याने ही एक प्रकारे त्यांना मदत झाली, असे बोलल्या जात आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांची येथून लढण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. चिखली मतदारसंघातून रविकांत तुपकर यांना ४४ हजार ५१५ एवढी चांगली मते मिळाली असून येथेही त्यांना फारसा विरोध झाला नाही. शिवाय, महायुतीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने येथून राहुल बोंद्रे उमेदवार राहतील, हे जवळपास निश्चित आहे. भाजपच्या आ.श्वेताताई महाले यांनी हा मतदारसंघ भरभक्कम बांधला असून, ग्रामीण व शहरी भागात त्यांची स्थिती मजबूत आहे. या मतदारसंघात रविकांत तुपकर यांना मिळालेले मताधिक्य हे श्वेताताईंचे होते की राहुल बोंद्रे याबाबत मात्र वेगवेगळी मते पुढे येत आहेत. तथापि, लोकसभा निवडणूक प्रचारात श्वेताताई या सावध भूमिका ठेवून असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथूनही रविकांत तुपकरांची निवडणूक लढण्याची शक्यता कमीच आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून तुपकरांनी ३८ हजार ८८४ मते घेतली. महायुतीकडून येथून विद्यमान आमदार संजय गायकवाड उमेदवार राहणार असून, महाआघाडीकडे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके, गणेश पाटील, संजय राठोड, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदींसह इतरही नावे चर्चेत आहेत. ही जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथून वंचित बहुजन आघाडीेदखील ओबीसी चेहरा मैदानात उतरविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. घाटाखालील खामगाव व जळगाव जामोद विधानसभेत रविकांत तुपकर यांना दखलपात्र मते मिळाली नाहीत. तर जळगाव जामोदमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशांत डिक्कर यांना मैदानात उतरवले असून, ते कामालाही लागले आहेत. एकंदरित राजकीय परिस्थिती पाहता, रविकांत तुपकरांना महाविकास आघाडी सावलीतही उभे करायला सध्यातरी तयार नसून, अपक्ष निवडणूक लढणे म्हणजे पायावर दगड पाडून घेण्यासारखे आहे. याची पुरेपूर प्रचिती रविकांत तुपकर यांना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. विशेष म्हणजे, अपक्षऐवजी एखाद्या पक्षाचा आधार घेऊन इलेक्शन लढा, आपला विजय निश्चित आहे, असे लोकसभा निवडणुकीआधी काही निवडक ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांना चिखलीतील भेटीत सांगत, सबुरीचा सल्लादेखील दिला होता. इतर पक्ष जवळ धरत नसल्याने व अपक्ष उमेदवाराची निवडणुकीतील परिस्थिती अस्थिर राहत असल्याने, विधानसभा निवडणूक कोठून, व कशी लढावी, हा प्रश्न सध्यातरी रविकांत तुपकरांना सतावत असल्याचे राजकीय सूत्राचे म्हणने आहे. मात्र असे असले तरी राजकारणात काहीही अशक्य नाही, हेही तेवढेच खरे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राज्यात व जिल्ह्यात राजकीय हवा तापविण्यात ‘मास्टर’ आहेत. आतादेखील त्यांनी शेतकरीप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचा डेमो दाखवतो, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले आहे. तुपकर यांच्या या घोषणेमुळे शिंदे गट चांगलाच खवळला असून, तुपकरांना धडा शिकविण्याच्या तयारीत असल्याचे कानावर येते आहे. मुंबईतील आंदोलन हे शिंदे गटाला डिवचण्यासाठी आहे, की शेतकर्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आहे, हादेखील प्रश्न निर्माण होत आहे. कारण, कापूस व सोयाबीनचे भावफरकाचे पैसे शेतकर्यांना मिळण्यास सुरूवात झाली असून, पीकविम्याच्या पैशाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. तसेच इतर शेतकरीहिताच्या मुद्द्यावर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी यापूर्वीच उच्चस्तरीय बैठक घेत सरकारकडून ते प्रश्न सोडवून घेतले आहेत. सोयाबीन व कापसाचा भाव हा केंद्रस्तरावरील मुद्दा असून, त्यासाठी तुपकरांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर नाही, तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करायला पाहिजेत. परंतु, ऐन विधानसभा निवडणुकीत आक्रमक आंदोलनाची घोषणा करून तुपकरांनी पोलिसांना कामाला लावले आहे, अशी राजकीय चर्चा झडत आहे. तुपकरांचे हे आंदोलन राज्यातील पोलिस यंत्रणा कसे हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
—————–