Head linesSINDKHEDRAJAVidharbha

निवडणुकीआधीच सिंदखेडराजा मतदारसंघातील वातावरण तापले!

– डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशिवाय पर्याय नाही; कार्यकर्त्यांचे मत!
– .. तर ‘तुतारी’ वाजणार कोण? याची उत्कंठा; बाहेरचा नकोच असाही कल!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व गाठीभेटी, चर्चासत्र, मेळावे घेतले जात असून, या मतदारसंघाचा ‘मी’च दावेदार, भावी आमदार असे बॅनर झळकू लागले आहेत. यात डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा कोठेही ‘मी’च पुन्हा येईल’ असा बॅनर अद्याप झळकला नाही. पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी निवडणूक लढविणारच असा निर्णय डॉ. सुनील कायंदे यांनी घेतला आहे. तर दिलीप वाघ हे शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून प्रयत्नशील आहेत. योगेश जाधव आणि डॉ.शशिकांत खेडेकर हेही शिंदे गटाकडून प्रयत्नशील आहेत. परंतु, योगेश जाधव यांनी यू-टर्न घेतल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. वंचित बहूजन आघाडीकडे सविताताई मुंढे या प्रबळ दावेदार आहेत. तर गायत्रीताई शिंगणे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘तुतारी’ वाजवली आहे. अशा किमान डझनभर नेत्यांनी ‘मी’च भावी आमदार असल्याचे बॅनर लावल्याने राजकीय वातावरण तापले असले तरी मतदार मात्र कमालीचा शांत दिसून येत आहे.

Sharad Pawar Sindkhed Raja Vidhansabha Election Politics Gayatri Shingne Vs Rajendra Shingne | अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी: सिंदखेडराजात आमदार राजेंद्र ...सिंदखेडराजा मतदारसंघात जातीयनिहाय मतदार मराठा (कुणबी) ८० हजार, वंजारी ६० हजार, माळी ३० हजार, बौद्ध २५ हजार, बंजारा १५ हजार, मुस्लिम २५ हजार, देशमुख १० हजार आणि इतर जातींतील मतदार ६५ हजार ३६० आहेत. असे एकूण मतदार ३ लाख १५ हजार ३६० आहे. अर्थात ही आकडेवारी अंदाजीत आहे. या मतदारसंघात सर्वप्रथम सत्ता मिळवली जगाराव चव्हाण यांनी. त्यानंतर सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी तर त्यानंतर दोन टर्म तोताराम कायंदे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. त्यानंतर सतत डॉ.राजेंद्र शिंगणे पाचवेळा आमदार झाले आहेत. २०१४ साली डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उभं न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी डॉ.शशिकांत खेडेकर यांनी विजय मिळवला होता, आणि ते पाच वर्षे एक यशस्वी आमदार म्हणून मतदारांच्या मनात होते. परंतु, २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांचा घात केला. युती धर्म पाळला नाही, पर्यायाने थोड्या मताने त्यांना पराभव पत्करावा लागला. तरीही मतदारसंघात स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी विकासाची कामे सुरुच ठेवली. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट जाऊन कामे करत असल्याने त्यांच्याविषयी मतदारसंघात एक सहानुभूती आहे. आज महायुतीची सत्ता आहे, आणि महायुतीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आहेत. अजित पवार यांच्या गटाकडून ते प्रबळ दावेदार आहेत. परंतु, त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलल्याने निवडणूकपूर्वी त्यांच्या हातात नेमकं काय आहे, हे येणारा काळच ठरवेल. मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते हे डॉ. शिंगणे यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत यावे, अशा मताचे आहेत. त्यामुळे डॉ. शिंगणे यांच्यावर मोठा दबाव आहे. अखेर निर्णय त्यांचा आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात अगोदरच गायत्री शिंगणे यांनी तंबू टाकून आपणच कसे प्रबळ दावेदार आहोत हे दाखवून दिले आहे. गायत्री शिंगणे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडे जाण्याचा मार्ग त्यांना कोणी दाखविला असेल! हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी आता तीही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्षाकडे डॉ.शशिकांत खेडेकर हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून योगेश जाधव यांच्याकडे पाहिले जात होते. काल त्यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली आहे. नेमकी भेट कशासाठी हे गुलदस्त्यात असले तरी निवडणूकपूर्व गाठीभेटी घेतल्या जात असल्याने त्यांचा मनसुबा उघड झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरातच डाव टाकल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे. भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ.सुनील कायंदे यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. पक्षाने आदेश दिले तर बरं नाही दिले तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांची आहे. त्यांनीही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. परंतु, पवार साहेबांनी कोणताही निर्णय सांगितला नसल्याने त्यांनी आपली स्वतंत्र घोडदौड सुरूच ठेवली आहे.

No photo description available.
सविताताई मुंढे

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत माळी, बौद्ध, वंजारी समाजाची मते मिळाली असती तर लोकसभा निवडणुकीत वसंतराव मगर यांना एक नंबरची मते प्राप्त झाली असती. तथापि, लोकसभेला मगर यांना केवळ प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांची मते मिळाली. बाकी मते विखुरल्या गेली. आज सविता मुंढे या वंचित आघाडीच्या प्रबळ दावेदार आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून दिलीप वाघ यांनी प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त केली आहे. त्यांचा पूर्वीपासून या मतदारसंघाशी संबंध राहिला आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही. एक कृषी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. २०१४ साली त्यांनाच उमेदवारी जवळजवळ पक्की झाली होती. परंतु, त्यांना डावलून शशिकांत खेडेकर मैदानात उतरले होते. काँग्रेस पक्षानेही उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली असून, अशोक पडघान यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे. मनोज कायंदे यांचीही तयारी आहे. परंतु, जागा कोणत्या पक्षाला सुटते याकडे लक्ष द्यावे लागेल, असा त्यांचा विचार आहे. या व्यतिरिक्त अनेक कार्यकर्त्यांची भावी आमदार म्हणून बॅनर झळकत आहेत. वेगवेगळी नावे समोर येत आहेत. परंतु, मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या युवा नेतृत्वाची गरज आहे, एवढे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!