– चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांतही पावसाची हजेरी
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपूर, ढसाळवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने सैलानी येथील बाजारपेठेत नदीच्या लोंढ्यासारखे पाणी वाहिले, त्यात अनेकांच्या दुकानातील सामान वाहून गेले. परिसरातील नदी-नाल्यांना पूर आले होते. नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. हे वृत्त लिहिपर्यंत सुदैवाने जीवितहानी झालेली नव्हती. तथापि, नुकसान मात्र खूप मोठे झाले आहे.
सविस्तर असे, की बर्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपूर, ढसाळवाडी या भागात सलग एक तास जोरदार पाऊस पडला. ढगफुटीसदृश पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानांत आणि घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतीपिकांचे देखील नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चाँद मुजावर यांनी केली आहे.
बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपूर, ढसाळवाडी या भागात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सलग एक तास मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू होता. परिणामी, शहरातील रस्त्यांना नदीनाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. बुलढाणा तालुक्यासह चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. अनेक भागांत रात्रभर पाऊस कोसळत होता. जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारीची उपाययोजना करण्यात आली असून, आपत्कालीन व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
———-