पुन्हा ‘शिंगणेविरूद्ध जाधव’ सामना; योगेश जाधव यांनी घेतली शरद पवारांची भेट!
– सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातून विधानसभेसाठी मागितली उमेदवारी!
बुलढाणा/पुणे (खास प्रतिनिधी) – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे व शिंदे गटातील युवा नेते योगेश जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील मोदीबाग येथे भेट घेतली. जाधव यांनी सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी चालवली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)कडून ते विधानसभेसाठी इच्छूक आहे. शरद पवारांच्या भेटीत त्यांनी उमेदवारीची मागणी केली. तथापि, पवारांनी त्यांना ठोस शब्द देण्याचे टाळले आहे. पवारांच्या पक्षाकडून या मतदारसंघात कु. गायत्रीताई शिंगणे या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असून, त्यांचे मतदारसंघात गावभेट दौरे सुरू आहेत. तसेच, त्यांनी त्यांचे काका व विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासमोरही प्रबळ आव्हान उभे केले आहे. त्यामुळे शरद पवार योगेश जाधव, की गायत्री शिंगणे यापैकी कुणाला उमेदवारी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचा फार कमी फरकाने विजय झाला. त्यांच्या मेहकर विधानसभा मतदारसंघातच ते लीड घेऊ शकले नाही. सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातूनही त्यांना लीड मिळाला नाही. तथापि, विजयानंतर केंद्रीय मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असून, त्यामुळे विदर्भात शिंदे सेनेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. महायुतीत सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे हे त्यांचे येथे विद्यमान आमदार आहेत. तर या मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हेदेखील इच्छूक आहेत. तथापि, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे व शिंदे गटाचे युवानेते योगेश जाधव यांनी गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघात तयारी चालवली असून, त्यांनी मतदारसंघातील संपर्कही वाढवला आहे, तसेच प्रतापराव जाधव यांच्या निधीतून विकासकामेही मार्गी लावली आहेत. परंतु, महायुतीकडून उमेदवारीची शक्यता नसल्याने, त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यादृष्टीनेच त्यांनी पुण्यातील मोदीबाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत पवारांनी त्यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. तसेच, सिंदखेडराजा मतदारसंघाबाबतही सविस्तर चर्चा केली. योगेश जाधव यांनी पवारंकडे पक्षप्रवेश व उमेदवारीबाबत विचारणा केली असता, पवारांनी त्यांना ‘तूर्त काही शब्द देता येणार नाही, पण तुम्ही पक्षाचे काम सुरू करा’, असा सल्ला दिला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. ‘योग्यवेळी याबाबत पक्ष निर्णय घेईल’, असेही पवारांनी त्यांना सांगितल्याचे कळते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कु. गायत्री शिंगणे यादेखील इच्छूक असून, पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई खेडेकर यांनी गायत्री यांचे नाव पक्षाकडे रेटून धरलेले आहे. या शिवाय, भाजपचे नेते तथा माजी आमदार तोताराम कायंदे यांचे चिरंजीव डॉ. सुनील कायंदे, माजी सनदी अधिकारी दिनेश गिते हेदेखील शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती असून, यांनीही पवारांकडे उमेदवारीबाबत चाचपणी केलेली आहे. या मतदारसंघातील जातीय समिकरणे व महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळते, हे पाहून शरद पवार उमेदवारी देणार आहेत. तथापि, योगेश जाधव यांच्या शरद पवार भेटीने मात्र या मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळले गेले आहे. खास करून विधानसभेची तयारी करणार्या गायत्री शिंगणे यांच्यासाठी हा जोरदार झटका मानला जात आहे. मध्यंतरी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘बाहेरचे काही पाखरं आमच्याकडे फडफड’ करत असल्याबाबतची पोस्ट टाकली होती. ती पोस्ट योगेश जाधव यांनाच उद्देशून होती. आता योगेश जाधव हेच पक्षात आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली तर, गायत्री शिंगणे या काय करतील? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता अत्यंत धुसर असल्याचे त्यांची निकटवर्तीय सांगत असून, तुपकर हे एकतर चिखली किंवा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून लढतील, असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना सिंदखेडराजा मतदारसंघातून जोरदार लीड मिळाला होता. त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ सुरक्षित वाटतो आहे. दुसरीकडे, चिखली विधानसभा मतदारसंघही त्यांच्यासाठी त्यांना सुरक्षित वाटत असला तरी, शहरातून त्यांना मतदान कमी होईल, अशी भीती आहे. तूर्त तरी तुपकरांनी चिखली व सिंदखेडराजा मतदारसंघावर ‘फोकस’ केले असून, लवकरच ते मतदारसंघाची घोषणा करतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.