BULDHANAChikhaliCrime

अवैध वाळूच्या भरधाव टिप्परने तरूणांना कट मारला; ग्रामस्थांना मारहाणही केली; स्वतःच टिप्परही पेटविला!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील इसरूळ गावात बसस्टॅण्ड चौकात उभे असलेल्या तरूणांना भरधाव वेगात असलेल्या अवैध वाळूवाहतुकीच्या टिप्परने कट मारल्याने व त्यात एक तरूण बालंबाल बचावल्याने संतप्त तरूणांना हा टिप्पर रोखण्याचा प्रयत्न केला. त्या टिप्परवर एका तरूणाने दगड भिरकावल्यानंतर टिप्परचा चालक पाच ते सहा जणांना घेऊन गावात आला व तरूणांवर हल्ला केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या लोकांना प्रत्युत्तर दिले. या टिप्पर मालकाच्या काही लोकांनी नंतर स्वतःच टिप्परच पेटवून दिला. ही घटना गावातील सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. इसरूळ येथून चालणारी अवैध वाळू वाहतूक पुन्हा एकदा गंभीर मुद्दा बनली असून, नजीकच्या काळात अवैध रेतीतस्करांना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे की टिप्पर चालकांच्या माणसांनीच टिप्पर पेटविला.

सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील मौजे इसरूळ येथून अवैध वाहतूक करणारे टिप्पर मोठ्या प्रमाणात चालतात. त्याचा त्रास ग्रामस्थ व शेतकरी यांना होतो. या अवैध वाळू वाहतुकीविरोधात माजी सरपंच तथा शिंदे गटाचे युवा उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी तीव्र आंदोलनेदेखील केली आहेत. परंतु या वाळू वाहतुकीला आळा बसला नाही. संतोष भुतेकर हे वारंवार महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे याबाबतच्या तक्रारी व पाठपुरावा करत आहेत. परंतु, या वाळू तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने अधिकारीदेखील अर्थपूर्ण दृष्टीने याकडे कानाडोळा करत आहेत. अवैध वाळू वाहतूक बंद करण्याऐवजी जोरात सुरू आहे. इसरुळमधून भरधाव वाहतूक करणारे टिप्पर याचा ग्रामस्थांना त्रास तर होतच आहे, पण त्यातून एखादी दुर्देवी घटनाही घडण्याची शक्यता आहे. खडकपूर्णा प्रकल्प असलेल्या देऊळगावराजा तालुक्यातील चिंचखेड, मंडपगाव, सुलतानपूर या गावातून ७ ते ८ बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जातो व त्या वाळूची वाहतूक टिप्परद्वारे चिखली तालुक्यातील इसरूळमार्गे जिल्हाभर व इतर ठिकाणी होत आहे.
एकीकडे ग्रामस्थांचा संताप असताना, दुसरीकडे १५ ऑगस्टच्या रात्री इसरूळ येथे बसस्टँडसमोर काही तरुण उभे असताना, त्यांच्याजवळून भरधाव अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर कट मारून गेल्याने व एक तरूण बालंबाल बचावल्याने तेथील तरुणांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. ते टिप्पर थांबले नाही, तेव्हा एका युवकाने टिप्परवर दगड भिरकावला. थोड्यावेळाने चालक हा त्याच्यासोबत ४ ते ५ जण घेऊन आल्याने गावातील तरुण व त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या गोंधळामध्ये अज्ञाताने उभे असलेले टिप्पर पेटवल्याने त्यास हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. दरम्यान, टिप्पर पेटविण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

या घटनेची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना कळताच, त्यांनी त्वरित उपनिरीक्षक जारवाल व पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर आंधळे यांना इसरूळ येथे पाठवले. चिखली नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने इसरूळ येथे येऊन आग विझविली. या पेटलेल्या टिप्परमुळे शेजारील चार-पाच दुकानांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. नजीकच्या काळात अवैध वाहतुकीविरोधात इसरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडीसह परिसरातील गावांतून तीव्र उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून स्वतःच टिप्पर जाळले गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या टिप्परचे मालक पंजाब घुबे हे देऊळगावमही येथील असून, त्यांनी याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात संतोष पाटील भुतेकर यांच्यासह दीपक पुंगळे, लाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संतोष पाटील भुतेकर यांनी ५० हजाराची खंडणी मागितली, खंडणी न दिल्यास या रोडवर टिप्पर चालवू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे आपण नैराश्यात गेल्याने स्वतःच टिप्पर जाळल्याचे या तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी  खासगीत बोलताना सांगितले, की संतोष पाटील भुतेकर व इसरूळमधील तरूणांना अटकविण्यासाठी टिप्पर मालकाने हा टिप्पर जाळला खरा, पण त्यांना तेव्हा हे माहिती नव्हते, ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाली आहे. आपण टिप्पर जाळताना दिसतोय, हे पाहून त्यांनी खंडणीची फिर्याद दाखल केली, असे गावातील काही प्रत्यक्षदर्शींनी खासगीत बोलताना सांगितले. या भागातील अवैध वाळू वाहतूक थांबली नाही, तर ग्रामस्थ आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच, संतोष भुतेकर व पंजाब घुबे हे दोघेही याप्रश्नी आपआपल्या तक्रारी मागे घेण्यास तयार असल्याचीही गाव परिसरात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!