जम्मू व काश्मीर, हरियाणा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला!
– जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत १८, २५ सप्टेंबर व १ ऑक्टोबरला मतदान
– हरियाणात सर्व जागांवर १ ऑक्टोबररोजी मतदान; दोन्ही राज्यांचा ४ ऑक्टोबररोजी निकाल
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू व काश्मीर तसेच हरियाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून, १८ व २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या मतदानाच्या तारखा आहेत. तसेच, हरियाणामध्ये एकाच टप्प्यात १ ऑक्टोबररोजी मतदान घेतले जाणार आहे. या दोन्हीही राज्यांच्या निवडणूक निकाल ४ ऑक्टोबररोजी जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, जम्मू व काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होत असून, कलम ३७० हटविले गेल्यानंतर या राज्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या दोन्हीही राज्यांत आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने या राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करून शांततापूर्ण वातावरणात निवडणूक घेण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सुरक्षा व्यवस्थेची तयारी आणि आगामी काळांतील सण, उत्सव पाहाता महाराष्ट्रातील निवडणूक तारखांची घोषणा नंतर केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मागील वेळी हरियाणा व महाराष्ट्र या दोन्हीही राज्यांच्या निवडणुका सोबतच झाल्या होत्या. महाराष्ट्राची घोषणा लांबणीवर का पडली, याबाबत आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले, की आम्ही सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जम्मू व काश्मीरमध्ये तातडीने निवडणूक घेण्याची मागणी केलेली आहे. या राज्यात शांततापूर्ण वातावरणात निवडणूक घेण्यासाठी आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. आम्हाला विश्वास आहे, की यावेळेस मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविले गेल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदारांचा कौल काय येतो, याकडे देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागून आहे. या राज्यात एकूण ८७.०९ लाख मतदार असून, त्यात ४४.६२ लाख महिला तर ४४.४६ लाख पुरूष मतदारांची संख्या आहे. तर ३.७० लाख युवक-युवती हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ९० सदस्यीय विधानसभेत ७४ जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, ७ एससी, ९ जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. बहुमतासाठी ४४ जागांची आवश्यकता आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी), भाजप, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आदी या राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहेत. दुसरीकडे, हरियाणा राज्यात एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार असून, २.०१ कोटी मतदार आहेत. त्यात १.०६ कोटी हे पुरूष तर ९५ लाख महिला मतदार आहेत. त्यातील ४.५२ लाख युवा मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९० जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. सद्या ४१ जागा जिंकलेल्या भाजपचे सरकार असून, काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे.
महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यांतही पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा २३ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यकाळ संपुष्टात येणार असून, त्यापूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २०१ तर महाविकास आघाडीला ६७ जागा मिळाल्या होत्या. भाजपने महाविकास आघाडीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन पक्ष फोडून पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. सद्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (भाजप) व अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) हे उपमुख्यमंत्री आहेत. या फोडाफोडीमुळे भाजपची राजकीय प्रतिमा डागाळलेली असून, त्याचा लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसलेला आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजप या राज्यात अडचणीत आहे. भाजपच्या आहे त्या जागा घटण्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
———