पालकमंत्र्यांविना यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा!
– स्वातंत्र्यदिन सोहळ्यातून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे जिल्हावासीयांना आवाहन
– टीबीमुक्त अभियानात निवड झालेल्या मासरूळ, खूपगाव, इरला, गुम्मी, उमाळा गावांचा झाला सन्मान
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी हा केंद्रबिंदू असल्याने शासन शेतकर्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतीच्या विकासासाठी पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीककर्ज, बियाणे, खते, शेती उपयोगी अवजारे आणि शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिक घेतो. त्यांनी इतर हमखास उत्पन्न देणार्या पिकांकडे वळावे. तसेच, चालूवर्षी मान्सूनमध्ये ६० टक्के पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ९.०५ वाजता राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना तिरंगा शपथ दिली. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, उपवनसंरक्षक सरोज गवस, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते. तथापि, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी यंदाच्या ध्वजारोहण सोहळ्यास दांडी मारल्याने त्याची कार्यक्रमस्थळी चर्चा रंगली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत संबंधित पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. तर बुलढाण्यात पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीत जिल्हाधिकार्यांना ध्वजारोहण व प्रमुख भाषण करावे लागले. त्यांच्या भाषणात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या धोरणात्मक बाबींचा उहापोह होता.
ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संदेश दिला. यात त्यांनी स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. तसेच सर्वस्व गमाविल्या स्वातंत्र्य सेनानींप्रती ऋण व्यक्त केले. सामान्य नागरिकांना सहज जीवन जगता यावे, तसेच त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी शासनाचे धोरणात्मक निर्णय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यात प्रशासन खारीचा वाटा घेत असल्याचे सांगितले. शेतकरी हा केंद्रबिंदू असल्याने शासन शेतकर्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतीच्या विकासासाठी पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीककर्ज, बियाणे, खते, शेती उपयोगी अवजारे आणि शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिक घेतो. त्यांनी इतर हमखास उत्पन्न देणार्या पिकांकडे वळावे, असे आवाहन केले. शेतमालावर प्रक्रिया करून जिल्ह्यातूनच निर्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे चालु वर्षात ८४१ कोटी निर्यात झाली आहे. चालूवर्षी मान्सूनमध्ये ६० टक्के पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा. शासनाने सर्व घटकांचा विकास साधात समतोल राखला आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना राबविण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा नियोजन व विकास समितीमधून जिल्ह्याला मिळालेल्या ४४० कोटींच्या निधीतून विकासकामे तसेच गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. लोणार सरोवराला जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच शहर सौदर्यीकरण, नगरोत्थान अभियानातून कामे करण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रशासन पूर्ण कार्यक्षमता आणि नेटाने कार्य करीत आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे अमूल्य देणगी असून स्वातंत्र्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा, असे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने देशाप्रती सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करावी, असा संकल्प करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल अंशुनी अहेर, दर्शना भगत, ध्रुव नागरीक, सार्थक ताथोड, स्वराज बंगाळे, वेदांग महारखेडे, श्रेयस अरबट, पार्थ तायडे, ऋचा कुलकर्णी, मधुजा काळे, श्रावणी मेंढे, जिल्हा पोलिस दलातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्ये रुजविण्याचा उपक्रमाबद्दल पुष्पा कोळी, वंदना उंबरहंडे, समाधान घुगे, टीबीमुक्त अभियानात निवड झालेली गावे मासरूळ, खुपगाव, ईरला, गुम्मी, उमाळा, उपवनसंरक्षक कार्यालयाच्या पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये कार्य केल्याबद्दल विलास देशमुख, वन्यजीव संवर्धनामध्ये कार्याबद्दल संदीप मडावी यांचा सत्कार करण्यात आला.