Breaking newsBULDHANAChikhaliVidharbha

सोनेवाडीतील शेतकर्‍यांच्या उपोषणप्रश्नी आ. श्वेताताई महालेंची यशस्वी मध्यस्थी; उपोषण सोडवून तत्काळ शेतरस्त्याचे काम सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश!

– एका शेतकर्‍याची तब्येत खालावल्याने रूग्णालयात दाखल

चिखली (महेंद्र हिवाळे) – पाझर तलावाने बाधित रस्ता खुला करण्यासह विविध मागण्यांसाठी चिखली मतदारसंघातील सोनेवाडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास आमदार श्वेताताई महाले यांनी आज, दि.१५ ऑगस्टरोजी भेट देऊन प्रशासकीय अधिकार्‍यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा घडवून आणली, आणि सामंजस्याने हे उपोषण सोडवले. याशिवाय उद्यापासून तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना आ. महाले यांनी प्रशासनाला दिल्या. या उपोषणातील एका शेतकर्‍याची तब्येत खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. आ. महाले यांच्यासह तुपकर यांनीदेखील उपोषणकर्त्यांना आपले आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली होती. या उपोषण आंदोलनादरम्यान, आंदोलक शेतकरी काळे यांची तब्येत खालावली होती. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर असे, की सोनेवाडी येथील सन १९९३-१९९४ मध्ये बांधलेल्या पाझर तलावाने बाधीत होऊन सांडव्यात गेलेला सोनेवाडी-पांगरी रस्ता सांडव्यावरून कायमस्वरूपी शेतकर्‍यांना खुला करावा, भविष्यात भिंत फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने भिंतीची दुरुस्ती करण्यासह साफसफाई करावी, तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार भूमी अभिलेख कार्यालयाने गट नं ८, ९, १०,११ ची मोजणी करण्यासह सीमा निश्चित करण्यात येऊन अतिक्रमित क्षेत्र ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावे, सोनेवाडी ते पांगरी रस्ता प्रकरणी शेतकर्‍यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे, सोनेवाडी येथील तलाठी बदली करून कायमस्वरूपी नवीन तलाठी द्यावा, या मागण्यांसाठी सोनेवाडी येथे हे उपोषण सुरू होते. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी आज, दि. १५ ऑगस्टरोजी या उपोषणास भेट देऊन उपोषणकर्त्यांचे प्रश्न समजावून घेतले. तसेच तहसीलदार संतोष काकडे, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत व उपजलसंधारण अधिकारी एस. एन. पाटील यांना पाचारण करून उपोषणकर्त्यांशी चर्चा घडवून आणली. एवढ्यावरच न थांबता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासोबत उपोषणकर्त्यांचा फोनवर संपर्क करून दिला व त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी आणि हे उपोषण सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सर्वसामान्य शेतकरी व जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही या प्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी याप्रसंगी देऊन ग्रामस्थांना आश्वस्त केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, नंदू कर्‍हाडे जिल्हाप्रमुख युवासेना, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, मुकेश पडघान, गणेश थुट्टे, संकेत पाटील, रितेश पवार, बबन पवार, अमोल तायडे, गोपाल वाळेकर, अरुण तायडे, अनिल अंभोरे, गणेश जाधव, सरपंच ज्ञानेश्वर गोफणे, पिंटू तायडे आदी उपस्थित होते.


सर्व राजकीय पक्ष, नेत्यांनी दिला होता आंदोलकांना पाठिंबा

शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेतली, तसेच तहसीलदार यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेच्या व चिखली तहसील कार्यालयात अधिकारी यांच्या बैठकीच्या अनुषंगाने झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सरनाईक यांनी आंदोलक शेतकरी यांच्याशी तहसीलदार श्री काकडे यांची भ्रमणध्वनीव्दारे चर्चा घडवून आणली तर तहसीलदार यांनी संंबंधित विभागाचे अधिकारी यांना सूचना दिल्याचे सांगितले आहे. दि. १५ ऑगस्ट सबंधीत सर्व विभागाचे अधिकारी आंदोलस्थळी येऊन योग्य कार्यवाही करण्याचे अश्वासन तहसीलदार यांनी आंदोलकांना दिले होते. सोनेवाडी येथील शेतकर्‍यांच्या उपोषण आंदोलनास युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांनी भेट दिली. तसेच, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, व काँग्रेसचे सत्येंद्र भुसारी यांनी भेट देत आपला पाठिंबा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!