ChikhaliHead linesVidharbha

चिखली मतदारसंघातील पांदण रस्ता योजनेत भ्रष्टाचार?; सखोल चौकशी करा!

– ५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत चिखली तहसीलदारांनी अर्धवट माहिती दिली; या भ्रष्टाचारात त्यांचाही सहभाग आहे का? चौकशीचीही मागणी

चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघात ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पांदण रस्ते योजने’मध्ये होणार्‍या रस्त्यांच्या कामाकरिता अंदाजपत्रकात २५ लक्ष रुपये मंजुरात देण्यात आली आहे. असे असताना या रस्त्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, फक्त रस्त्यावर ४० मिलीमीटर गिट्टीचा थर टाकून मुरूम डबी करण्यात आली. या पूर्वी लोकसहभागातून जी कामे झालीत तशा स्वरुपाची न करता अकुशलच्या नावे खोटी बिले काढण्यात आली. तर आता कुशलची बिले तयार होत असून, लवकरच तीदेखील काढण्यात येणार आहेत. या अत्यंत गंभीर अशा या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव धनंजय देशमुख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. मो. इसरार, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ.सत्येंद्र भुसारी, जिल्हा परिषद सदस्य अशोक पडघान यांची उपस्थिती होती.

राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चिखली मतदारसंघात मातोश्री पांदण रस्ते योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, या योजनेत रस्त्यांचे जे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यात २५ लक्ष रुपयाला मंजुरात देण्यात आली असून, त्यामध्ये झाडेझुडपे काढणे, काळी माती खोदणे, कच्चा मुरूम खोदणे, पक्का मुरूम टाकणे, ८० एमएम, ४० एमएम खडी टाकणे व डबी करणे अशी कामे आहेत. मात्र असे असतांना चिखली मतदारसंघामध्ये या रस्त्यांच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, प्रत्यक्षात रस्त्यावर ४० एमएम गिट्टीचा थर व मुरूम टाकून दबाई करण्यात आलेली आहे. यापूर्वी लोकसहभागातून जी कामे झालेली होती, त्या पद्धतीने कामे न करता तशी केली असल्याचे दाखवून त्याचे पैसे अकुशलच्या माध्यमातून काढून घेण्यात आली आहेत. व आता कुशलची बिले तयार होत असून, लवकरच ती काढण्यात येणार आहेत. या अत्यंत गंभीर अशा भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मतदारसंघात पांदण रस्ता योजनेअंतर्गत सुरु असलेल्या व पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामामध्ये आतापर्यंत अदा केलेल्या अकुशल कामाच्या रक्कम (देयक) संदर्भात रस्तानिहाय माहिती तातडीने मिळणेबाबत मागणी केली आहे. या प्रकरणी चुकीची अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करणार्‍या चिखली व बुलढाणा तहसीलदार यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे सदर रस्त्यांची कामे अंदाजपत्रक २५ लक्ष रुपयांची असतांना फक्त ८ लक्ष रुपयांत करा म्हणून सांगणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्याची चौकशी करण्यात यावी. सदर भ्रष्टाचाराचे प्रकरण व्हायरल होत असताना तहसीलदार चिखली व बुलढाणा यांनी पांदण रस्ता योजनेत कुशलच्या कामांवर एक रुपयाही खर्च झाला नाही, याचे तसे पत्र तातडीने दिले. तहसीलदार यांच्या पत्रात अकुशल वर झालेला खर्च मात्र लपविण्यात आला. त्यामुळे तहसीलदार यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. तसेच उपरोक्त तहसीलदार यांची या भ्रष्टाचार प्रकरणात असलेल्या सहभागाबद्दल तातडीने चौकशी करण्याबरोबर सदर प्रकरणी आवश्यक ती माहिती एक आठवड्याच्या कालमर्यादेत देण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची विनंती, या निवेदनाद्वारे माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना केली आहे.


अर्धसत्य माहिती देऊन दिशाभूल करणार्‍या चिखली व बुलढाणा तहसीलदारांची चौकशीची मागणी

या योजनेत ५६ कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना माध्यमांच्या समोर येऊन कुशल अंतर्गत एकही पैसा खर्च झाला नाही, त्यामुळे भ्रष्टाचाराचा संबंधच येत नाही. अशी अर्धवट व दिशाभूल करणारी माहिती तहसीलदार चिखली व बुलढाणा यांनी दिली. अकुशल अंतर्गत झालेला खर्च लपवून ठेवण्यात तहसीलदार यांचा भ्रष्टाच्यार्‍यांना संरक्षण देण्याचा हेतू होता का ? की त्यांचादेखील या भ्रष्टाचारात सहभाग आहे? याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील राहुल बोंद्रे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात माध्यमांसमोर जाऊन आरोप नाकारणारे चिखली व बुलढाणा तहसीलदार हे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!