१५ ऑगस्टजवळ आला तरी झेडपी शाळांतील विद्यार्थी गणवेशाविना!
– जिल्हाभरातील पालकांसह विद्यार्थीही संतप्त!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शिक्षणासाठी गोरगरिबांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांशिवाय पर्याय नाही. परंतु, राज्य सरकार या शाळांकडे दुर्लक्ष करत आहेत. लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या फुकट्या योजनांवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असताना, जिल्हा परिषद शाळांतील गोरगरिबांच्या मुलांना शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी गणवेश व पुस्तके मिळालेले नाहीत. एकीकडे १५ ऑगस्ट जवळला आला असताना, अद्यापही मुलांना गणवेश नसल्याने तो कधी मिळेल, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गदेखील विचारत आहेत. केवळ गणवेशच नाही तर विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तकेही मिळालेली नाहीत.
ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळा ह्याच महत्त्वाच्या आहेत. शहरी भागात जाऊन खाजगी शाळांचे दरपत्रक पाहून चक्कर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गरीब, मध्यम वर्गीयांची मुले आज प्राथमिक शाळेतच आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या १० हजार असून, १ ली ते चौथी आणि ५ ते ७ वीपर्यंत शिक्षण घेणार्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात येतो. यातील सिंदखेडराजा पंचायत समितीच्या अंतर्गत येणार्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना यापूर्वी तोकडी मदत शासनाकडून अनुदान तत्वावर मिळत असे. त्यात गणवेश बसत नव्हता, म्हणून शिक्षक संघटनांनी हा गणवेश शासनाने आपल्या स्थरावर नियोजन करून वाटप करावा, अशी विनंती केली. शासनाने एका आर्थिक विकास महामंडळाची नियुक्ती करुन यावर कापड खरेदी करुन गणवेश शिवून द्यावा, अशी तरतूद केली. परंतू शालेय शैक्षणिक सत्र सुरू होऊन आज दोन महिने झाले तरी शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश वाटप झाले नाही. यावर पालकांनी नाराजी व्यक्त केली. आज शासन लाडली बहीण योजना आणि लाडला भाऊ योजनेवर खर्च करीत आहे. परंतु, शालेय शिक्षण पद्धतीत कोणताही निर्णय घेताना हात आखडता घेत आहे. गरीब घरातील विद्यार्थी शिकला पाहिजे याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही शालेय पुस्तकाचे वाटप करताना काही शाळेत पुस्तके वाटप करताना पुस्तकांची कमतरता भासत आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण चांगले मिळालेत आणि विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करुन ग्रामीण भागातील शाळा समृद्ध कराव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे .
—
प्राथमिक शाळा ह्याच महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पहिली पायरी आहे. शासनाने पहिलीच पायरी कमकुवत ठेवली तर भविष्य उज्ज्वल कसे होईल, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत.
– सर्जेराव मंडळकर, पालक, साखरखेर्डा