मनमानी भोवली; अशोक वाडीभस्मे यांच्याकडील जिल्हा आगार व्यवस्थापकपदाचा कार्यभार काढला!
– थेट मुख्यमंत्र्यांकडे झाल्या होत्या भाडीभस्मेंविरोधात तक्रारी
साखरखेर्डा/बुलढाणा (अशोक इंगळे) – बुलढाणा जिल्हा आगार व्यवस्थापक अशोक वाडीभस्मे यांच्या ढिसाळ कारभारामुळे एस.टी. महामंडळाचे कर्मचारी व प्रवासी वैतागले होते. मागणी करुनही बंद झालेल्या बसेस सुरु न केल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. अखेर जिल्हा आगार व्यवस्थापक अशोक वाडीभस्मे यांच्याकडील कार्यभार काढला असून, अकोला येथील जिल्हा व्यवस्थापकाकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव, चिखली, मेहकर येथे एस टी महामंडळाचे आगार आहे. एस टी बसची चाके ग्रामीण भागातील रस्त्यावर चालावी, ग्रामीण भागातील प्रवाशांना एस टी बस उपलब्ध व्हावी, शाळेतील मुलांना पास देऊन ग्रामीण भागातील प्रत्येक गावात बस जावी, अशी मागणी प्रवाशांची असते. ही मागणी प्रवासी आमदार आणि खासदार यांच्याकडे करतात. आमदार पत्र देऊन उपरोक्त बस लवकर सुरु करण्याचे आदेश देतात. कधी कधी फोन लावून मागणीची दखल घेतली की, नाही याची चौकशी करण्यात येते. तेव्हा हा निगरगट्ट अधिकारी फोन घेत नाही. प्रवाशांची मागणी असताना बसेस सुरु करीत नाही. कर्मचारी सांगतात तरीही दखल घेत नाही. मागील आठवड्यात कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांच्या कार्यभाराबद्दल रोष व्यक्त करीत निषेध केला होता. सिंदखेडराजा येथे शालेय विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने संदीप मेहेत्रे यांनी आंदोलन केले होते. साखरखेर्डा हे गाव ग्रामीण भागातील सर्वात मोठे गाव असून, या गावातून चिखली, खामगाव, शेगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिंदखेडराजा येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही. बंद केलेल्या बसेस सुरु करण्याची मागणीसुध्दा अशोक वाडीभस्मे यांच्याकडे केली होती. परंतु, त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही.
अशा निष्क्रिय अधिकार्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन प्रशासकीय अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सदर तक्रारीची चौकशी होऊन अशोक वाडीभस्मे यांच्याकडील कार्यभार काढून अकोला येथील जिल्हा व्यवस्थापक शुभांगी शिरसाळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. शुभांगी शिरसाळ यांनी ग्रामीण भागातील प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांची आहे.