ChikhaliHead linesVidharbha

मुलाने आईच्या कष्टाचे चीज केले आणि झाला फौजदार!

– कु. रेणुका घुबे हिचीही आरोग्य विभागासह तलाठी पदावरही झाली निवड
– गावातील कर्तबगार बहीण-भावाची गावातून मिरवणूक; ग्रामस्थांचा आनंद गगणात मावेना!

देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) – येथील सचिन राजेंद्र घुबे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) पदावर निवड झाली आहे. त्यांचे वडिल पंधरा वर्षांपूर्वी वारल्यानंतर त्यांच्या आईने शेतात कबाडकष्ट करून सचिन यांना शिकवले. त्यांनीदेखील आईच्या कष्टाचे चीज करत फौजदार पदाला गवसणी घालून गावाचा लौकिकही वाढवला. यासह गावातीलच कु. रेणुका घुबे हिने तलाठी परीक्षेसह आरोग्य विभागाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली, व दोन्ही ठिकाणी तिची निवड झाली. तथापि, महसूल सेवेत जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. सचिन व रेणुका या दोघाही भावा-बहिणीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील माता-भगिनींनी त्यांना ओवाळून या यशाबद्दल त्यांचे औक्षण केले.

सविस्तर असे, की देऊळगाव घुबे येथील सचिन राजेंद्र घुबे यांची घरची परिस्थिती बेताची असताना व वडिलांचाही आधार हरपलेला असताना त्यांच्या आई संगिताताई घुबे यांनी मोठ्या कष्टाने त्यांना शिकवले. सचिन यांनीदेखील आईच्या कष्टाचे व ग्रामस्थांच्या विश्वासाचे चीज करत राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत फौजदार पदाला गवसणी घातली. त्यांची राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाली आहे. तसेच, गावातीलच कु. रेणुका प्रल्हाद घुबे या मुलीने महसूल सेवेची तलाठी व आरोग्य विभागाचीही स्पर्धा परीक्षा दिली होती. आपल्या कष्ट व गुणवत्तेच्या जोरावर ती या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिची तलाठी व ग्रामीण रूग्णालयात अशा दोन्ही ठिकाणी निवड झाली. यापैकी महसूल सेवेतच जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. या दोन्हीही गुणवंत भावा-बहिणींनी गावाचा लौकीक वाढविल्याने ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. तसेच, गावातून मिरवणूकही काढण्यात आली. गावातील माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करत, त्यांना आशीर्वाद दिले. याप्रसंगी ग्रामस्थांसह मोठ्या प्रमाणात तरूण-तरूणी यांची उपस्थिती होती. या दोन्हीही गुणवंत भावा-बहिणींचे सिंदखेडराजाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, चिखलीच्या आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील, ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे यांच्यासह सर्वस्तरातून तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.


आजचा दिवस देऊळगाव घुबेवासीयांसाठी एक कौतुकास्पद दिवस

आज देऊळगाव घुबे येथील सचिन राजेंद्र घुबे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी, जानकीदेवी विद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका प्रल्हाद घुबे हिची जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये व सोबतच तलाठी म्हणून निवड, तर निवृत्ती संजय सावळे याची संभाजीनगर येथे पाटबंधारे प्रकल्प अधिकारी.पदावर निवड. तसेच, नागेश सुनील सुर्वे याची SRPF निवड झाल्याने चौघांचीही गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत गावातील महिलांनी सर्वांचे पूजन करून सर्व गावकऱ्यांच्यावतीनी जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक आणि महिला, तरुण, तरुणी उपस्थित होत्या.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!