पटवारी, मंडळ अधिकार्यांचे आंदोलन मागे; उद्यापासून ‘महसूल’चे कामकाज सुरूळीत होणार!
– जिल्हाधिकार्यांच्या वरिष्ठस्तरीय बैठकीत मागण्यांवर निघाला यशस्वी तोडगा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जिल्हातील तलाठी यांच्या प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी जिल्हाध्यक्ष विजेंद्रकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वात दि.१८ जुलैपासून आंदोलन सुरु केलेले होते. या आंदोलनाला यश आले असून, संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर यांनी दिली. त्यामुळे पटवारी (तलाठी) व सर्व मंडळ अधिकारी हे उद्यापासून (दि.९) कामावर पूर्ववत होणार असून, नागरिकांची कामे मार्गी लागणार आहेत.
या आंदोलनच्या रूपरेषेनुसार, विविध टप्प्यात आंदोलन करण्यात येऊन दि. २९/०७/२०२४ पासून सामूहिक रजा आंदोलन सुरु केले होते. दि.०७/०८/२०२४ रोजी जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे सकारात्मक तोडगा न निघाल्याने बाळकृष्ण गाढवे, अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ केंद्रीय शाखा नागपूर यांच्या नेतृत्वात आंदोलांची व्याप्ती वाढविण्याचा इशारासुद्धा देण्यात आला होता. जिल्हातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने गावगाड्यातील महसुली कामकाज ठप्प झाले होते. विविध योजनेचे कामकाज बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीमध्ये तब्बल ११ दिवसांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर दिनांक ०८/०८/२०२४ रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी बुलढाणा शरद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाणा पदाधिकारी यांच्यासोबत आंदोलनच्या नोटीस मधील मागण्यांबाबत सकरात्मक चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये प्रस्तावित अन्यायकारक बदल्यांचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याबाबत जाहीर करण्यात आले. नियतकालिक बदल्यासाठी समुदेशन घेण्यात येऊन त्यानुसार बदल्या करणे, याबाबत आश्वासित करण्यात आले, विनंती व आपसी बदल्या नियमानुसार करण्याचे आश्वासित केले गेले, आंदोलन काळातील सामूहिक रजा ह्या अर्जित रजेत परावर्तीत करण्याचे मान्य केले. कार्यरत तलाठी व मंडळअधिकारी यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देणेचे मान्य केले. तसेच इतर मागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरवा करणे बाबत मान्य केले. आंदोलन काळात तसेच गौणखनिज प्रकरणात तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई न करणेबाबत आश्वासित केले. वरील सकारात्मक चर्चेस अधीन राहून विदर्भ पटवारी व मंडळअधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाणाच्या वतीने सुरु असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले व सकारात्मक तोडगा काढण्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
या चर्चेवेळी विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे, विदर्भ मंडळअधिकारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विजय टाकळे, मंडळअधिकारी संघाचे केंद्रीय सहसचिव प्रेमानंद वानखेडे, मंडळअधिकारी संघाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सातपुते, अशोक शेळके जिल्हा सचिव मंडळ अधिकारी संघटना, बुलढाणा, विनोद भिसे, जिल्हा उपाध्यक्ष, वि.प.स.बुलढाणा, शिवानंद वाकदकर, जिल्हा सचिव, संजय डुकरे, जिल्हा सहसचिव, संतोष राठोड कोषाध्यक्ष व जिल्हातील इतर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सदर आंदोलनामध्ये विदर्भ पटवारी संघ नागपूर केंद्रीय शाखाचे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, केंद्रींय सरचिटणीस संजय अनव्हाने व केंद्रीय कार्यकारणी तसेच विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हासचिव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हातील सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व सभासद यांनी मेहनत घेतली. तसेच विविध समाज माध्यमे, विविध संघटना, विविध लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, विध्यार्थी मित्र, शेतकरी बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यानेच हे आंदोलन यशस्वी होऊ शकल्याने विदर्भ पटवारी व मंडळअधिकारी संघ नागपूर यांच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले.