भक्ती महामार्गाचा ज्वलंत मुद्दा महाविकास आघाडीकडून ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न!
– विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकरीप्रश्नाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव या प्रस्तावित भक्ती महामार्गाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व शेतकरी एकत्र आले असताना, महाविकास आघाडीच्यावतीने आज (दि.६) हे आंदोलनच ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे, विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसह भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत व शेतकर्यांनी कालपासून चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, जीवावर उदार होऊन हे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे, आ. श्वेताताई महाले, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांनीदेखील शेतकर्यांचा विरोध असलेला हा महामार्ग रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाही आज महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी अमडापूरजवळील करतवाडी येथे काही शेतकरीपुत्रांसह हे ‘आंदोलनच हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फुकटची स्टंटबाजी करू नये’, असा संतापही काही कार्यकर्ते व शेतकरी खासगीत बोलताना व्यक्त करत होते.
सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग करण्यास शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे. शेतकर्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही; असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केलेले आहे. दुसरीकडे, हा महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, शेतकरी यांनी तीव्र आंदोलने चालवली आहेत. त्यासाठी कृती समिती गठीत करण्यात आलेली असून, या कृती समितीत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी आहेत. असे असतानाही महाआघाडीच्या नेत्यांनी आज करतवाडी येथे शेतकरीपुत्रांना पुढे करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी टॉवरवर तरूणांना चढवून आंदोलन केले गेले. यावेळी काँग्रेसचे सत्येंद्र भुसारी, शिवसेना (ठाकरे गट) नंदू कर्हाडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतीताई खेडेकर यांची उपस्थिती होती. शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून राज्य सरकारचा निषेध करत, महामार्ग रद्द करण्याची मागणी केली.
मॉसाहेब जिजाऊंचे माहेरघर सिंदखेडराजा ते विदर्भ पंढरी शेगाव असा हा प्रस्तावित ‘भक्ती महामार्ग’ आहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातील तब्बल ४३ गावांतील सुपीक शेतजमीन यासाठी संपादित करण्यात येणार होती. यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहे. यामुळे या मार्गाला मंजुरी मिळाल्याबरोबर विरोध होऊ लागला. ४३ गावांतील अनेक ग्रामपंचायतींनी या विरोधात ठराव घेतले आहेत. यापाठोपाठ माजी मंत्री तथा सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंगणे यांना लेखीपत्र देत, हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केलेली आहे.
या महामार्गाचे भूसंपादन तातडीने थांबवावे आणि मार्गच रद्द करावा, अशी आग्रही मागणी डॉ. शिंगणे यांच्यासह चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनीदेखील केलेली आहे. दरम्यान, हा महामार्ग राजकीय प्रचाराचा जोरदार मुद्दा राहणार असल्याने महाआघाडीच्या नेत्यांनी तो हायजॅक करून त्याला राजकीय वळण देण्याचे प्रयत्न चालवले असल्याचे आजच्या स्टंटबाजी आंदोलनातून दिसून आले आहे. एकीकडे, हा महामार्ग रद्द करण्यासाठी कालपासून विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्यासह शेतकरी नेत्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले असताना, दुसरीकडे कृती समितीच्या सर्व सदस्यांना विचारात न घेता महाआघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून स्टंटबाजी करत, त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे. ही बाब चिखलीसह सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांतील अनेकांना खटकली आहे.
—————
शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी उपासले अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार!