बिबी (ऋषी दंदाले) – लोणार येथील जगप्रसिद्ध जलधारेचे पाणी कावडयात्रेद्वारे आणून त्याद्वारे बिबी येथील महादेव मंदिरात जलाभिषेक केला जाणार आहे. यासाठी तब्बल दिडशे शिवभक्त हे कावडयात्रेसाठी गेले असून, आजच सायंकाळी ६ वाजता हा जलाभिषेक पार पडणार आहे.
सविस्तर असे, की आज (दि.५) श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे लोणार जगप्रसिद्ध सरोवर येथील धारेवरून कावड यात्रेद्वारे बिबी येथील महाकाल कावड मंडळ यांच्यावतीने महादेवाला जलाभिषेक करण्याकरिता जल आणले जात आहे. गेल्या वर्षभरापासून बिबी गावातील भाविक भक्तांनी हा उपक्रम राबवणे सुरू केलेले आहे. या महाकाल कावड यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे महादेवाची मूर्ती खांद्यावर घेऊन महाकाल असे लिहिलेले भगव्या रंगाचे शर्ट परिधान करून हे १५० शिवभक्त लोणारच्या धारेचे पाणी घेऊन शारा, सुलतानपूर, अंजनी खुर्दमार्गे बिबी या ठिकाणी महादेवाला जलाभिषेक करण्याकरिता आज, सायंकाळी ६ वाजता संतोषी माता मंदिरावर असलेल्या महादेव मंदिरामध्ये पोहोचणार आहेत. त्यानंतर कावड यात्रेमध्ये पायी चालत आलेल्या या शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.