बुलढाणा (बाळू वानखेडे) – तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करत, राज्य सरकारने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात अमरावती विभागातील सात तहसीलदारांसह पाच उपविभागीय अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तहसीलदारांसह सिंदखेडराजा उपविभागाचे प्रांताधिकारी प्रा. संजय खडसे यांचाही समावेश आहे.
सविस्तर असे, की जिल्ह्यातील खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांची तासगाव (सांगली) येथे बदली झाली असून, त्यांच्या जागेवर खामगाव येथे तिवसा (अमरावती) येथून सुनील पाटील हे येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार माया माने यांची तुळजाभवानी मंदीर संस्थान, तुळजापूरच्या व्यवस्थापकपदी बदली झाली आहे. तर मोताळा तहसीलदारपदी हेमंत पाटील येत असून, ते धामणगाव रेल्वे (अमरावती) येथे कार्यरत होते. मोताळाचे तहसीलदार वैभव पिलारे यांची बदली प्रस्तावीत आहे. तसेच, अमरावती विभागातील पाच उपविभागीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात सिंदखेडराजा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) प्रा. संजय खडसे यांची पुसद (यवतमाळ) येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुसद येथून आशीष बिजवल हे येत आहेत.
विशेष म्हणजे, प्रा. खडसे यांनी सिंदखेडराजा महसूल विभागातील वाळूतस्करांवर कारवाईचे सत्र राबवून वाळूतस्करीला चांगलाच लगाम लावला होता. तसेच, अकोल्याप्रमाणे ते या विभागातही चांगलेच लोकाभिमुख निर्णयामुळे लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या या बदलीमुळे वाळूतस्करांत आनंदाची लाट निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणूक अनुषंगाने राज्य सरकारने या बदल्या केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
———