आजोबांचा वारसा चालविण्यासाठी नात सज्ज; उद्या कु. गायत्री शिंगणेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे सिंदखेडराजात उदघाटन!
बिबी (ऋषी दंदाले) – शेतकरी, शेतमजूर, कष्टकरीवर्गासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) मातृतीर्थ सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर जनसामान्यांचा जनक्रांती आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्रीताई शिंगणे यांच्या नेतृत्वात धडकणार आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढणे, या प्रमुख मागणीसह इतरही अनेक मागण्या या मोर्चामध्ये मांडण्यात येणार आहेत. या मोर्चात पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई खेडेकर, नरेश शेळके, प्रसेंजित पाटील अशी मातब्बर मंडळीही सहभागी होणार आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एक दिवस सिंदखेडराजा मतदारसंघाच्या विकासासाठी द्यावा, असे आवाहन गायत्रीताई शिंगणे यांनी केले आहे. या मोर्चानंतर गायत्रीताईंच्या जनसंपर्क कार्यालयाचेदेखील मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन होणार असून, सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या राजकीय, सहकार व जनसामान्यांच्या नेतृत्वाचा वारसा पुढे चालविण्यासाठी गायत्री शिंगणे यानिमित्ताने सज्ज होणार आहेत.
उद्या मोर्चा भव्यदिव्य निघणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे असून, हा मोर्चा संपल्यानंतर सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व मागण्या यावर पूर्णवेळ कार्य करण्यासाठी कु. गायत्री शिंगणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई खेडेकर यांच्याहस्ते होणार आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे आशीर्वाद व युवकांच्या साथीने सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये एक परिवर्तनाची नांदी घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तरी परिवर्तनाच्या या लढाईत आपल्या लेकीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मोर्चाला व उद्घाटनालाही उपस्थित रहावे, अशी साद मतदारसंघातील सर्व जनतेला आपण घालीत आहोत, असे गायत्री शिंगणे म्हणाल्या.
राज्यात काका-पुतण्यांचा राजकीय संघर्ष पहायला मिळाला आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघात काकाविरूद्ध पुतणीचा राजकीय संघर्ष पहायला मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. या मतदारसंघात विकास कामांबाबत असलेली ओरड, रस्ते, पाणी यासह वीजेची समस्या, आणि साखरखेर्डा तालुक्यासह इतर मागण्यांकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे डॉ. शिंगणे यांना यंदाची निवडणूक अवघड असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः या मतदारसंघात लक्ष घातल्याने विद्यमान आमदार डॉ. शिंगणे यांना निवडणूक अजिबात सोपी राहिलेली नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही त्यांना या मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना लीड देता आला नाही, त्यामुळे गायत्रीताई शिंगणे यांना यावेळेस मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची जोरदार संधी आहे, अशी चर्चाही मतदारसंघात रंगली आहे.
—-