जिल्ह्यात पाऊस मुक्कामी; हुमणीने सोयाबीनला घेरले; पिके पिवळी, वाढही खुंटली!
– शेतकर्यांच्या नाकातोंडात पाणी; धरणातील पाणीसाठा मात्र किंचितच सरकला!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस मुक्कामीच आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. ना निंदणं, ना डवरे, ना फवारणी. यामुळे सोयाबीन पिकावर हुमणी व तसेच अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. कपाशी तसेच उडीद, मूगसह इतरही पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसत असून, पिके पिवळी पडत चालली आहेत, तसेच त्यांची वाढही खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. असे असताना धरणातील जलसाठ्यात मात्र पाहिजे तशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.
जून महिन्यात जिल्ह्यात फारच कमी पाऊस झाला. जुलैच्या सुरुवातीला जिल्ह्यातील काही भागात रिमझिम सुरू झालेला पाऊस पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर बरसत आहे. या पावसामुळे शेती मशागतीची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. पेरणी झाल्यानंतर पिकाला निंदण, डवरणी व फवारणी आवश्यक असते. परंतु सततचा पाऊस सुरू असल्याने पिकाची कोणतीही मशागत करता आली नाही. परिणामी, जिल्ह्यातील बरेच तालुक्यात सोयाबीनवर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अळीनेही मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशीसह इतर पिकावर आक्रमण केले आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली असून, पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यावर नियंत्रण मिळण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे, कृषी सहाय्यक पी. एस. अंभोरे यांनी शेतकर्यांची बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शनदेखील केले. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला विविध रोगांनी घेरल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
शेतकर्यांचे सरकार म्हणणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या अगोदर नुकसानीची जाहीर केलेली मदत जिल्ह्यातील बरेच शेतकर्यांना अजूनही मिळाली नाही. तसेच पीकविम्यासाठीही शेतकरी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवून वैतागले आहेत, हेसुद्धा नाकारून चालणार नाही. एकीकडे सततच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला असताना जिल्ह्यातील बहुतांश धरणात मात्र समाधानकारक जलसाठा असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्प ४२.४२ टक्के, पलढग ६३.५२, मस ९३.९५, तोरणा ३०.६७, कोराडी १४.५५, मन २९.५५, उतावळी २८.३५, नळगंगा ३६.२४, पेनटाकळी १५.१२ एवढा जलसाठा आहे. इतरही प्रकल्पाची स्थिती याहून वेगळी नाही. येत्या दोन दिवसानंतर विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असून, पुढील आठवड्यापासून काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचे बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ मनेश येदुलवार यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.