– तलाठी, मंडल अधिकार्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्षाने आंदोलन चिघळण्याची शक्यता
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – जिल्हा प्रशासनाने जिल्हातील तलाठी यांच्या प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी विजेंद्रकुमार धोंडगे, जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात दि.१८ जुलैपासून आंदोलन सुरु केलेले आहे. या संपामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, या संपावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
शेतकर्यांचा थेट संबंध हा पटवारी यांच्यासोबत येतो. शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला महत्त्वाचा आहे. पहिली पायरी ही पटवारी यांची असते. आज विद्यार्थी आणि शेतकरी पटवारी कार्यालयात जातात तर कुलूप लावलेले दिसते . आज पटवारी व मंडल अधिकारी संघ नागपूर यांचे सदर आंदोलन हे प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, विनंती व आपसी बदल्या करणे, जिल्हास्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावे, प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी /मं.अ.यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी. या शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्यांसाठी करण्यात येत असून, दि.१८ जुलै रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. त्यानंतर दि.२३ जुलैरोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु जिल्हा प्रशासनाने तलाठी संवर्गाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका आतापर्यंत न घेतल्याने दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यांनंतर दि.२६ जुलैरोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या डीएससी तहसील कार्यालयात जमा केल्या. यानंतरही जिल्हा प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी यांनी दि.२९ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. जिल्हातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने गावगाड्यातील महसुली कामकाज ठप्प झाले असून, लाडकी बहिण योजनेसाठी लागणारे दाखले, शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे उत्पन्न दाखले, पीककर्ज प्रकरणासाठी लागणारे सातबारा, फेरफार व इतर कागदपत्र मिळत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाचा सुरु असलेला महसुली पंधरवाडा तलाठी व मंडळ अधिकारी यांचेविना केवळ नावापुरताच उरलेला आहे. सद्य स्थितीमध्ये शासनाचे इ-पीक पहाणी, पीककर्ज, शेतरस्ते, पंचनामे, तसेच इतर योजनांचे कामकाज प्रभावित झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थिती शेतकरी व सामन्य नागरिक चिंतातूर असताना जिल्हा प्रशासनाने कोणताही सकारात्मक तोडगा न काढल्याने आठवडाभरानंतरही जिल्हा प्रशासन गाढ झोपेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समाज माध्यमांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेतली असताना जिल्हा प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असून, त्यांनी या बाबत संघटनेच्या प्रतिनिधींनी ना लेखी स्वरुपात कोणत्याही प्रकारे चर्चेला बोलवले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता असून, दोन दिवसात जिल्हा प्रशासनाने तोडगा न काढल्यास सदर आंदोलनाची व्याप्ती विदर्भ पटवारी संघ नागपूर यांचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भात वाढविणार असल्याची माहिती विजेंदरकुमार धोंडगे जिल्हाध्यक्ष विदर्भ पटवारी संघ जिल्हाशाखा बुलढाणा यांना दिली आहे.