– मेहकरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ; आरोपी पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने करत होता तपासणी
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शहरातील अवैध गर्भलिंग निदान सेंटरचा पीसीपीएनडीटी पथकाने पर्दाफास केला असून, केंद्र चालकाला या पथकाने पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजताच्यादरम्यान शहरात ही कारवाई करण्यात आली. किसन गरड पाटील असे आरोपीचे नाव आहे. औषधी आणि वैद्यकीय उपकरणे विक्रीचा व्यवसाय करणारा किसन गरड हा रेडिओलाजिस्ट डॉक्टर नसूनही त्याने मेहकर शहरातील जिजाऊ चौकातील एका संकूलात ‘निदान सोनोग्राफी सेंटर’ थाटले होते.
गर्भलिंग निदानासाठी इच्छूक जोडप्यांना हेरून किसन गरड हा आपला गोरखधंदा चालवत होता. तसेच, अशा जोडप्यांना तो पोटातील बाळ मुलगा आहे की मुलगी आहे, हेही उघड करून सांगत होता, अशी माहिती गर्भलिंग निदानविरोधी पथकाला मिळाली होती. हा आरोपी गर्भलिंग निदानासाठी इच्छूक जोडप्यांना हेरून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळून त्यांना मेहकर शहरातील पवनसूत नगरात भाड्याने घेतलेल्या दोन रुमवर बोलवायचे आणि पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने तपासणी करुन मुलगा की मुलगी? निदान सांगायचे. असा त्याचा अवैध धंदा सुरू होता. या माहितीवरून पीसीपीएनडीटी पथकाने एका गर्भवती महिलेला डमी ग्राहक म्हणून किसन गरड याच्याकडे सोनोग्राफी तपासणीसाठी पाठवले. त्याने शनिवारी (दि.३) दुपारी १ वाजता भाड्याने घेतलेल्या रुमवर तपासणीला बोलावले. महिलेची गर्भलिंग सोनोग्राफी केली आणि गर्भात मुलगा असल्याचे निदान सांगितले. त्याचवेळी आसपास दबा धरून बसलेल्या पीसीपीएनडीटीच्या पथकाने छापा टाकून आरोपी किसन गरड याला ताब्यात घेऊन कारवाई केली. वैद्यकीय अधिकारी, वकील व पोलीस या पथकात सहभागी होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला रितसर अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई पोलिस करत आहेत.