टाळ-मृदंगांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीत संतश्रेष्ठ गजाननांच्या पालखीचे विदर्भात स्वागत!
– संत गजाननांच्या दर्शनासाठी शहरवासीयांची लोटली गर्दी!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – ‘गण गणात बोते’, ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’, अशा संतांच्या नामघोषात विदर्भाचे पंढरपूर समजल्या जाणार्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत आगमन झाले. विदर्भाच्या हद्दीत पालखी सोहळ्याने प्रवेश करताच, फटाक्यांची आतषबाजी, टाळ-मृदंगांचा गजर झाला. श्रींच्या स्वागतासाठी रांगोळी काढल्या गेली होती तर फुलांची उधळण करण्यात आली होती. माळ सावरगाव ते सिंदखेडराजा शहरापर्यंत हजारो भाविक-भक्तांनी श्रींच्या पालखीसोबत पायदळ चालत संत गजाननांच्या चरणी आपली अल्पशी का होईना पायीवारी समर्पित केली.
शेगाव निवासी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे स्वगृही आगमन झाले असून, मराठवाडा-विदर्भाच्या हद्दीमध्ये माळ सावरगाव येथे पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विदर्भाच्या सीमेवर रांगोळी काढण्यात आली होती. तसेच पालखी मार्गावर फुलांची उधळण करण्यात आली होती. आपल्या मायभूमीत आगमन होताच शेकडो वारकर्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. यावेळी श्रींच्या पालखीचे दर्शन शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ, मनोज कायंदे, शिंदे गटाचे युवानेते योगेश जाधव, नगराध्यक्ष सतीश तायडे, माळ सावरगावचे सरपंच कठोरे, पत्रकार मंडळी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्यांबरोबरच हजारो भाविक-भक्तांनी घेतले. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर गण गण गणात बोते, जय गजानन जयघोष करत पालखी सोहळ्यातील वारकरी एकमेकांना आलिंगन देवून टाळ मृदुंगाचा स्वरामध्ये आनंद व्यक्त करत होते.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला होता. हा सोहळा ता. २१ जुलै रोजी करकंब पंढरपूरवरुन शेगांवसाठी मार्गस्थ झाला होता. तब्बल १४ दिवसांच्या पायी प्रवासानंतर या सोहळ्याचे विदर्भात आगमन झाले आहे. वारकर्यांसाठी नाश्ता, पाणी, चहाची, फराळाची व्यवस्था रस्त्याने करण्यात आली होती. ‘श्री’च्या पालखीचे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर ठीकठिकाणी पुष्पवृष्टी, रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. स्थानिक नगरपरिषद, विविध शासकीय कार्यालयांमार्फत व स्थानिक नागरिकांच्यावतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठीकठिकाणी मनोभावे स्वागत करण्यात आले. ‘श्री’च्या पालखीमुळे शहरांमध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाकडून ‘श्री’ची पालखी शहरांमध्ये दाखल होईपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता. जालना-सिंदखेड राजा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक पोलीस विभागाकडून बंद करण्यात आली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार ब्रह्मानंद शेळके, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना तगडा बंदोबस्त ठेवला होता. पालखीचा मुक्काम जिजामाता विद्यालय सिंदखेडराजा या ठिकाणी असून, हा पालखी सोहळा उद्या बिबी येथे मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. दि.११ ऑगस्टरोजी श्रींचा पालखी सोहळा संतनगरी शेगाव येथे दाखल होणार असून, पालखी सोहळ्याचे हे ५५ वे वर्षे आहे. पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवल्या गेली असून, पंढरपूर ते शेगाव असा जाण्या-येण्याचा १३०० किलोमीटरचा पायदळ प्रवास पालखी सोहळ्याद्वारे वारकरी बांधवांनी पूर्ण करत आणला आहे.
—————-