कु. गायत्री शिंगणेंच्या नेतृत्वात सिंदखेडराजात तहसीलवर धडकणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा!
– रस्ते, जिजाऊ स्मारकासाठी निधी, साखरखेर्डा, बिबी, देऊळगावमही येथे नगरपंचायत, साखर कारखाना, सुतगिरणी सुरू करण्याच्या मागण्या आणल्या ऐरणीवर!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्या मांडीत त्या तत्काळ सोडविण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कु. गायत्रीताई गणेश (मुन्ना) शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा सोमवारी (दि.५) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे काढण्यात येणार असून, हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. शेती, विकास, सिंचन यासह ज्वलंत मुद्द्यावर हा मोर्चा काढला जाणार असून, कु. गायत्री यांनी आपले सख्खे काका तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः कु. गायत्री यांना राजकीय ताकद दिल्याने या मतदारसंघात पवार हे काय राजकीय खेळी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात रस्ते, जिजाऊ स्मारकासाठी निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम सुरू करण्यात यावे, साखरखेर्डा, बिबी, देऊळगावमही नगरपंचायत करण्याची मागणी, जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरु करावा, पैनगंगा सहकारी सुतगिरणी सुरु करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.
दरम्यान, सिंदखेडराजा येथील मोर्चात सिंदखेडराजा तालुका मागणीचा मुद्दा नसल्याचे दिसून येत असून, या मागणीला बगल का दिली, अशीही चर्चा होत होती. गायत्रीताई शिंगणे यांची ओळख माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची पुतणी म्हणूनच आहे. सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांची नात आणि एकेकाळी लढवय्ये युवानेते गणेश उर्फ मुन्ना शिंगणे यांची ती मुलगी असा परिचय आहे. सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी १९७५ ते १९९२ या काळात बुलढाणा जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने, सुत गिरणी, जिल्हा सहकारी बँक, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे जाळे निर्माण करुन बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला होता. पैनगंगा सहकारी सुतगिरणी साखरखेर्डा येथे स्थापन करुन साखरखेर्डा येथे जिनिंग फॅक्टरी, बिबी येथे कापूस खरेदी केंद्र यासह अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. कापूस एकाधिकार योजना संपुष्टात आल्यानंतर अनेक ठिकाणची खरेदी केंद्र बंद झाली. आजोबा आमदार असताना त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन या मतदारसंघात काय पोकळी निर्माण झाली याचा अभ्यास करून गायत्रीताई शिंगणे यांनी मतदारसंघ पुन्हा बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने साखरखेर्डा मतदारसंघाचे राजकीय समिकरणे बदलली आहेत. या मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी ज्येष्ठ व मातब्बर नेते शरद पवार यांनी घरातच डाव टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे पाहता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दोन नावे समोर आली आहेत. परंतु, या दोन्ही नावांनी अद्याप तरी पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. मराठा लॉबीतली एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिले जात आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण करायला सुरूवात केली आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्षातील पदाधिकार्यांच्या बैठकींना त्या हजर राहात असून, सिंदखेडराजा मतदारसंघात रस्ते, जिजाऊ स्मारकासाठी निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम सुरू करण्यात यावे, साखरखेर्डा, बिबी, देऊळगावमही नगरपंचायत करण्याची मागणी, जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरु करावा, पैनगंगा सहकारी सुतगिरणी सुरु करावी, यासह अनेक मागण्यांसाठी त्यांनी आक्रमक व जनहिताची भूमिका घेतली आहे. प्रत्येक बसस्थानकावर त्यांचे बॅनरही झळकत आहेत. ह्या सर्व मागण्या मांडत असताना साखरखेर्डा तालुका करण्याबाबतची मागणी मात्र त्या करताना दिसत नाही, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गायत्री शिंगणे यांचे गाव शेंदुर्जन असतांना या भागातील नागरिकांच्या समस्या त्यांनी घ्यायला पाहिजे होत्या, असा सूर जनतेतून उमटत आहे. गायत्री शिंगणे यांनी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला ही बाब स्वागतार्ह आहे. कारण जनतेच्या समस्या काय आहेत हे मांडण्यासाठी नागरिकांना लोकनेता हवा असतो. आपल्या संघर्षात काकांचा सहभाग अप्रत्यक्ष निश्चितच नसेल. परंतु, ही संघर्षाची ‘तुतारी’ कितपत यशस्वी होईल? हा येणारा काळच ठरवेल.
शरद पवारांचे मिळाले आशीर्वाद.
सिंदखेडराजातील मोर्चा ठरणार ‘आमदारकी’साठीचा ‘लिटमस टेस्ट’!
सिंदखेडराजा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असून, दोन तालुक्यांसह लोणार व चिखली तालुक्यांतील काही गावेही या मतदारसंघात सामील आहेत. या मतदारसंघात सहकारी संस्था ताब्यात असल्यामुळे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जोरदार वर्चस्व आहे. तसेच, सर्व मोठ्या गावांत त्यांचे जवळचे कार्यकर्ते मातब्बर आहेत. एकीकडे सहकार लॉबी स्ट्राँग असताना दुसरीकडे, मतदार मात्र शरद पवार यांच्या विचारांना मानणारा आहे. डॉ. शिंगणे यांना शरद पवार यांनी मंत्रिपदे, आमदारकी, खासदारकीसाठी संधी, असे सर्व काही दिले. परंतु, डॉ. शिंगणे यांनी पवारांची साथ सोडून अजितदादांना साथ देणे पसंत केले. त्यामुळे शरद पवार हे डॉ. शिंगणे यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. त्याचा वचपा शरद पवार शांत डोक्याने काढल्याशिवाय राहणार नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच पवारांनी शिंगणे यांच्या घरातीलच नव्या पिढीला राजकीय ताकद देत, या मतदारसंघातून संधी देण्याचे निर्धारीत केलेले दिसते आहे. सोमवारचा मोर्चा हा कु. गायत्री शिंगणे यांचे शक्तिप्रदर्शन ठरणार असून, त्यामागे पवारांची पॉवर असेल, अशी चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता पाहाता, कु. गायत्री शिंगणे या विधानसभेत पोहोचल्याच तर त्यांना पहिल्याच झटक्यात लालदिवाही मिळण्याची शक्यता राजकीय धुरिणांकडून वर्तविली जात आहे.
————-