– पालखी मुक्कामाची सर्व तयारी पूर्ण; पोलिसांकडून वाहतूक व बंदोबस्ताचेही चोख नियोजन
बिबी (ऋषी दंदाले) – विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावनिवासी संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी पंढरपूर परतीच्या मार्गाने येत असताना, विदर्भातील दुसरा मुक्काम रविवारी, दि. ४ ऑगस्टरोजी बिबी येथे वसंतराव नाईक विद्यालय येथे होणार आहे. तेथे परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन महाराज पालखी नियोजन समिती व ग्रामस्थ बिबी यांच्याकडून करण्यात आले आहे. या पालखी मुक्काम सुविधेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
काही दिवसापासून सतत पडणार्या रिमझिम पावसामुळे व पावसाचे दिवस असल्यामुळे गजानन महाराज पालखीमधील वारकरी, भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी बिबी ग्रामस्थांनी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केली आहे. तर पालखी मार्गाची स्वच्छता करून घेतली असून, महिलांकडून पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच महाराजांच्या मुखवट्याचे मुख्य दर्शन महिला, पुरुष यांना शांततेत घेता येईल, अशा प्रकारे दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्त, वारकर्यांसाठी भोजनाची व रात्रीच्या झोपण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या खोल्यांची लाइटिंग सजावट करून करण्यात आलेली आहे. तसेच सकाळच्या आंघोळीची चहापानाची उत्कृष्ट व्यवस्था तसेच वाहनांची पार्किंग व्यवस्थासुद्धा नियोजनबद्ध बिबी ग्रामस्थांनी केले आहे.
बिबी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संदीप पाटील यांनीसुद्धा पालखी मार्गावर वाहतुकीचे उत्तम नियोजन करून गजानन महाराज पालखीच्या सुरक्षितेसाठी वाढीव पोलीस कर्मचारी, होमगार्ड बोलावून घेतले आहे. चालून चालून थकलेल्या वारकर्यांच्या पायांची मालिश आयुर्वेद तेलाने करून देण्याची सेवा गोपाल खंडागळे आयुर्वेदाचार्य पारायण नाडी वैद्य व त्यांचे सहकारी ग्रुप हे करणार असून, गावातील महिला, पुरुष, तरुण मंडळी स्वतःहून पालखीतील वारकर्यांच्या सेवेसाठी उभे राहून सेवा देणार आहेत. तसेच बिबी परिसरातील भाविक भक्तांनी गजानन महाराज दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिबी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
—————
https://fb.watch/tJYTsgtlek/