शेतकरीप्रश्नी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकर्यांची मलकापूर उपविभागीय कार्यालयावर धडक!
– आज शांततेच्या मार्गाने आलो, लवकरात-लवकर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करणार – रविकांत तुपकर
मलकापूर (तालुका प्रतिनिधी) – पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणार्या व्यापार्यांवर कारवाई व शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली आज (दि.३ ऑगस्ट) रोजी शेतकर्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने शेतकर्यांच्या खात्यात पीकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकर्यांच्या फसवणूक करणार्या व्यापारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
मलकापूर परिसरात डॉ.प्रफुल्ल पाटील नामक व्यापार्यांनी शेतकर्यांची मोठी फसवणूक केली आहे. हा व्यापारी शेतकर्यांच्या मेहनतीचा सोयाबीन-कापूस पैसे न देता खरेदी करून फरार झाला आहे. या व्यापार्याने जवळपास ९० कोटी पेक्षा रकमेचा शेतकर्यांना गंडा घातला आहे. या व्यापार्यांची संपत्ती विकून शेतकर्यांची संपूर्ण वसूल करून द्यावी, अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली. तसेच शेतकर्यांना गेल्यावर्षीचा १०० टक्के पीकविमा मिळावा, तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाउंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकर्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक तातडीने मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे तात्काळ मिळावे, तातडीने शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागण्यांसाठी शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे व मलकापूर शहरचे ठाणेदार श्री.गिरी यांच्या चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आज शांततेच्या मार्गाने आलो आहे, लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला. या मोर्चाला दामोदर शर्मा, अमोल राऊत, सचिन शिंगोटे, नीलेश नारखेडे, रणजीत डोसे, दत्ता पाटील, भागवत धोरण, विजय बोराडे, उमेश राजपूत, समाधान भातुरकर, राहुल मोरखेडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.