चिखलीत मंगळवारी धडकणार बाळासाहेब आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा
चिखली (महेंद्र हिवाळे) – इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणासाठी तसेच, ओबीसी समाजाला धीर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. येत्या मंगळवारी (दि.६) ही यात्रा चिखली येथे येणार असून, जास्तीत जास्त ओबीसी, एससी, एसटी बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे चिखली तालुका सचिव जितेंद्र निकाळजे, शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे व तालुका पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेला जातीयद्वेष कमी व्हावा, व शांतता कायम रहावी, ओबीसींचे आरक्षण टिकून रहावे, यासाठी २५ जुलैपासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्रे दिली गेली आहेत. राज्यात अनेक ओबीसी नेत्यांवर हल्ली झाले, त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा प्रचंड घाबरलेला आहे. ओबीसी बांधवांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी १४ दिवसांची ही यात्रा आहे. आरक्षण बचाव यात्रेचा दि. ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेने समारोप होणार आहे. ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण वाचले पाहिजे. या समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे. पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच, १०० ओबीसी आमदार निवडून आणणे, ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, यासह इतर गंभीर प्रश्नांकडे सरकारचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी ही यात्रा सुरु केलेली आहे.
येत्या दि. ६ आगस्ट रोजी ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात येणार असून, चिखलीमध्ये या यात्रेचे मोठ्या जल्लोषात विविध ओबीसी, एससी, एसटी संघटनांकडून स्वागत होणार आहे. अंबाशी फाटा, कोलारा फाटा, मेहकर फाटा येथे माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अशोक वाटिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठीक साडेबारा वाजता कॉर्नर सभा घेऊन ही यात्रा बुलढाणाकडे रवाना होणार आहे. तरी या यात्रेत आपल्या हक्काच्या लढाईसाठी जास्तीत जास्त संख्येने एसटी, एससा,r ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिखली तालुका सचिव जितेंद्र निकाळजे, शहर अध्यक्ष बाळासाहेब भिसे व तालुका शहर पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.