साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोरील नगरपरिषदेने लावलेली सुशोभित झाडे अचानक तोडून टाकली गेली आहेत. याचा निषेध आज पर्यावरण रक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबद्दल सर्वस्तरातून पुरातत्व विभागाच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त होत आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाडा परिसरात नगर परिषदेच्यावतीने सुशोभित वृक्ष लागवड करुन छानसा बगीचा तयार करण्यात आला होता. येणार्या पर्यटकांना आकर्षित करण्यात येणारी बाग आज पुरातत्व विभागाने तोडून भकास केली आहे. याची पूर्व सूचना कोणालाही देण्यात आली नाही. ही झाडे तोडण्याचा उद्देश काय आहे. हेही कळायला मार्ग नाही. अचानक वृक्षतोड झाल्याने पर्यावरण प्रेमी अॅड. संदीप मेहेत्रे, बाळू शेवाळे, मंगेश खुरपे, नीलेश ठाकरे, संजू मेहेत्रे, कौतुक ठाकरे, ज्ञानेश्वर खांदेभराड, शहाजी चौधरी, दिलीप काळे, दिलीप चौधरा, रामेश्वर घाटोळकर, नागेश कुरंगळ यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी राजवाड्यासमोर जमा होऊन पुरातत्त्व विभागाचा निषेध केला. परिसरातील बागेत युवकांच्या व्यायाम करण्याचे साहित्य होते. त्याचेही नुकसान केले गेले आहे. खरंतर ही बाग नगरपालिका हद्दीत असून, राजवाडासमोर बाग असल्यानेच शोभा दिसत होती. राजवाड्याचा कोठेही पुरातत्त्व विभागाने विकास तर केला नाही. परंतु, हा पवित्र परिसर भकास करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असाही आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.