बुलढाणा (संजय निकाळजे) – मागील वर्षी राज्य शासनाने कंत्राटी भरतीचा घाट घातला होता. मात्र या भरतीला कडाडून विरोध झाल्यामुळे आणि तरुणांच्या रेट्यामुळे ही भरती रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा नवा घाट घातला आहे. वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट-क व गट-ड या संवर्गातील मंजूर ६ हजार ८३० पदे बाह्यस्रोतामार्फत (कंत्राटी) भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या भरतीसाठी मनुष्यबळ पुरविणार्या कंपन्यासाठी विभाग स्तरावर निविदा प्रक्रियाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विशेष म्हणजे ‘क’ दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे. त्यामुळे कंत्राटी भरतीमुळे सरकार विरोधी वातावरण निर्माण झाल्याचे दिसल्यानंतर हे पाप महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० ऑक्टोबर २०२३ रोजी केली. ३१ ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला. मात्र केवळ नऊ संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. अनेक शासकीय विभागामधील कंत्राटी भरती सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. १२ जुलैला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय काढला असून, ५९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गट- क व गट-ड संवर्गातील ६ हजार ८३० पदे बाह्य स्वतः मार्फत बाह्यश्रोतामार्फत भरली जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरविणार्या कंपन्यांची निवड केली जाणार आहे. राज्य सरकारने १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी भरतीसाठी मनुष्यबळ पुरविणार्या नव कंपन्यांची नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकदा विभागनिहाय कंत्राटी भरतीसाठी निविदा प्रक्रिया राबवून त्याचं ९ कंपन्यांची निवड करण्यात येते की नवीन कंपन्यांची निवड केली जाते हे येणार्या काळातच समजणार आहे.
—-
ही पदे भरणार ..
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गट-क प्रवर्गातील १ हजार ७३० तर गट- ड प्रवर्गात ५ हजार १०० पदावर कंत्राटी भरती होणार आहे. गट-क मध्ये लघुलेखक, वाहनचालक, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य शिक्षक, लघुटंकलेखक अशा कुशल आणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे.