साखरखेर्डा (अशोक इंगळे) – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अशी राजकीय पदे भूषवित आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून निवड झाली आहे. त्यांनी साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानला भेट देऊन विकास आराखड्यातून काय देता येईल का, याचा विचार करून मदतीचा हात पुढे केला होता. त्यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे यांनी महाराज श्रींची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला होता. या आठवणींना आता साखरखेर्डावासीयांनी उजाळा दिला आहे.
ग्रामीण भागातील संस्थानला उच्चपदस्थ व्यक्तिने भेट देऊन विकास कामांसाठी काही मदत करता येईल का? असा विचार करणारे काही मोजकेच लोक असतात. परंतु, ग्रामीण भागातील संस्थाने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजासमोर आदर्श ठेवित असेल तर तो जगासमोर चांगला संदेश असतो. प पु . प्रल्हाद महाराज रामदासी यांनी १९ व्या शतकात श्रीराम हे आपले आदर्श असून, त्यांची उपासना हे आपले कर्तव्य आहे. हा मंत्र देऊन मन शांत ठेवायचे असेल तर भक्ती महत्त्वाची आहे, असा संदेश दिला आहे. आज संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम केले जातात. २०१८ मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना साखरखेर्डावासीयांना करावा लागत होता. त्यावेळी साखरखेर्डा येथे आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांची सरपंच महेंद्र पाटील यांनी रावसाहेब देशपांडे यांच्या घरी भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली होती. त्याचवेळी सभापती हरिभाऊ बागडे यांनी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना फोन करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आदेश दिले होते. एक आत्मीयता असलेला लोकप्रिय नेता अशी ओळख झाली. आज हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून निवड झाली. त्यांचे प.पू. प्रल्हाद महाराज संस्थानच्यावतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
———