साखरखेर्डा परिसरातील शेतकरी खरिप हंगाम पीकविम्याच्या प्रतीक्षेत; रब्बीच्या पीकविमा वाटपातही गोंधळ!
– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे ग्रामस्थ व शेतकरीवर्गाकडून तक्रार दाखल
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा हे गाव तालुका ठिकाणापासून ६० किलोमीटर अंतरावर येत असल्याने या भागातील शेतकर्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. या भागात नियुक्त कर्मचारी कोठे आहेत? याचा शोध केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी रास्त मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
साखरखेर्डा, शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा अशी महसूलची तीन मंडळे या भागात आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा येथे असून, उपकार्यालय दुसरबीड या नावाने आहे. पूर्वी हे तालुका कृषी उपकार्यालय साखरखेर्डा येथे असतांना काही अधिकार्यांनी आपल्या सोयीसाठी दुसरबीड येथे हलविले. तेथे कोठेही कृषी विभागाचे अधिकारी राहात नाही. सिंदखेडराजा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच बसून कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आपला कारभार हाकत आहेत. अतिवृष्टी, पिकावर येणारे रोग, दुष्काळ, शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन, शासकीय योजनेची माहितीही शेतकर्यांना मिळत नाही, किंवा दिली जात नाही. तीन वर्षांपूर्वी समाधान वाघ या कृषी सहाय्यकाचे प्रमोशन झाले. त्यांची बदली झाली. त्यांच्या सोबत कृषी पर्यवेक्षक म्हणून जितेंद्र सानप यांनीही उत्कृष्ट मार्गदर्शन करीत शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला. अतिवृष्टी असो, दुष्काळ असो, अळीचा प्रादुर्भाव असो अशा संकटात उभं राहून शेतकर्यांना मदत मिळवून दिली. पीकविम्याचा लाभ मिळवून दिला. आजही शेतकरी त्यांचे नाव घेऊन कर्मचारी असावे तर असे, असे बोलतात. गेल्या तीन वर्षांपासून साखरखेर्डा भागातील कृषी पर्यवेक्षक कोण आहे, कृषी सहाय्यक कोण आहे हे शेतकर्यांना माहितीच नाही. काही योजनेची फाईल भरावयाची असल्यास सिंदखेडराजा येथे जावे लागते. तेथे कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी मिळत नाही. दौर्यावर गेल्याची माहिती दिली जाते.
साखरखेर्डा येथील कृषी कार्यालय पूर्ववत सुरु करा!
साखरखेर्डा, शेंदूर्जन, मलकापूर पांग्रा या तीन जिल्हा परिषद आणि मंडळासाठी साखरखेर्डा येथे कृषी कार्यालय सुरू करावे. त्यांचा लाभ शेतकर्यांना घेता येईल, अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.
– बाबुराव मोरे, माजी समाजकल्याण सभापती, तथा उपजिल्हाप्रमुख शिवसेना
——
साखरखेर्डा भागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांनी साखरखेर्डा येथे थांबून शेतकर्यांची समस्या सोडवावी. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल.
– तेजराव देशमुख, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
आज साखरखेर्डा, गुंज, मोहाडी, राताळी, सवडद, वरोडी, पिंपळगाव सोनारा , शिंदी, तांदुळवाडी, बाळसमुंद्र, जागदरी, आंबेवाडी, कंडारी, भंडारी, राजेगाव, उमणगाव, सायाळा, दरेगाव येथील शेतकर्यांना कृषी सहाय्यक सापडत नाही. युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकर्यांची फसवणूक सुरु आहे. कृषी अधिकारी यांना दुकानदार सापडत नाही. खरीप हंगामात शेतकर्यांनी पीकविमा काढला, आजपर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही. रब्बी हंगामात हरबरा पिकाचा विमा काढलेल्यांना विमा मिळत आहे. परंतु, काहींना लाभ काही हातचोळत आहे. साखरखेर्डा येथील शेतकर्यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार केली आहे.
———