हिवरा आश्रम (प्रतिनिधी) – पती हा जन्माचा सोबती असतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ करण्याची इच्छा असूनही कधीकधी दुर्दैवाने एकमेकांना सोडून जीवन जगावे लागते. एकाकी जीवन जगतांनाही हे जग सुखी करण्याची माणसाची नैसर्गिक भावना असते. ईश्वराने निर्माण केलेला हा मोठा संसार त्यातील आपणा सर्वांचे एकमेंकाशी माणूसकीचे नाते लागते. हे नाते जपण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो याचा प्रत्यय विवेकानंद आश्रमात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमाने आला. लोणार येथील गीता राजेश खरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी आपला पती राजेश खरात यांच्या मृत्यू नंतर त्यांचा स्मृतीदिन अपंग, कर्णबधिर, अनाथ व मागासवर्गीय मुलांच्या सोबत त्यांना मिष्ठान्न भोजन देवून साजरा केला.
मुले ही देवा घरची फुले आहेत. ज्या मुलांना शारिरीक अपंगत्व आहे. अशा मुलांना प्रेमाची व आपुलकीची भूक असते. त्यांच्यासोबत वेळ घालविल्याने त्यांना आपल्या सहवास लाभल्याने एक प्रकारचे सुख अनुभूवता येते. या गोष्टीची जाणीव ठेवून विवेकानंद आश्रमाच्या निवासी अपंग व कर्णबधिर विद्यालयात तसेच बी. सी. होस्टेलमध्ये गीता खरात आपल्या नातेवाईकांसह आल्या. याप्रसंगी त्यांनी मुलांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोरे मॅडम व बी. सी. होस्टेलचे अधीक्षक विजय ठोकरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, दत्तात्रय गाडगे, सौ. संगीता खरात, प्रतिक राजेश खरात,कर्णबधिर विद्यालयाचे उध्दव धांडे इत्यादी होते. दत्तात्रय गाडगे यांनी समाजातील सर्वांनी पारंपारीक प्रथेला बाजुला ठेवून सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांची कास धरावी. श्रीमती गीता खरात यांचा हा आदर्श ठेवावा. प.पू.शुकदास महारांनी दीन, दुःखी लोकांसाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांचे हे सेवाकार्य सर्व जाती,धर्माच्या लोकांसाठी उपयोगी पडत आहे. त्यांच्या या कार्यात प्रत्येकाचा सहभाग असावा, असे मनोगत व्यक्त केले. सर्वमान्यवरांनी मुलांना पंगतीत वाढले व भोजनाचा आनंद घेतला.