– जिल्हा नियोजन समितीची बैठक; जिल्ह्याला मिळणार ४४० कोटींचा निधी
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शासनाची महत्वाची असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत जिल्ह्यातून ५ लाख महिलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत ३ लाख २१ हजार महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या अर्जांची आठ दिवसात छाननी करण्यात येईल, असे सांगून जिल्ह्याला यावर्षी ४४० कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निधी प्राप्त करून घ्या, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीला दिल्या. या निधीतून नियमित निधीव्यतिरिक्त दोन कोटींचा निधी हा शाळांच्या दुरूस्तीसाठी खर्च करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. विकासकामे करण्याला केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होतील, अशी सूचनाही मंत्रीमहोदयांनी याप्रसंगी प्रशासनाला केली.
जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला ४४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार कामे होणे अपेक्षित आहे. सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त होणार्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा. यावर्षीच्या निधीतून शाळा आणि अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, राजेश एकडे, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, वादळी वारे आणि पावसामुळे शाळा खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील जुन्या शाळांच्या इमारतींना तडा जाणे आणि छपरावरील टीनपत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत. शाळांमध्ये चांगल्या सोयी मिळण्यासाठी शाळा सुस्थितीत असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित निधीसोबतच अतिरिक्त दोन कोटी रुपयांचा निधी देऊन ही कामे प्राधान्याने करण्यास करण्यात यावे. यामुळे शाळांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. विकास कामे करण्याला केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्याने निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहे. त्यामुळे सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी त्यांच्या निधी प्राप्तीसाठी आवश्यक ती कारवाई करून निधी प्राप्त करून घ्यावा. प्रत्येक विभागाला मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग होण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील नद्या खोलीकरण करण्याविषयी नागरिकांची मागणी होत आहे. या कामाचे सर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी देऊन १३० किलोमीटरच्या जिल्ह्यातील मन, तोरणा आणि पैनगंगा या प्रमुख तीन नद्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल. यामुळे नद्यांचे खोलीकरण होऊन पूर परिस्थिती आणि शेतामध्ये नदीचे पाणी जाऊन होणारे शेतपिक आणि जमीन खरडून होणारे नुकसान टाळता येईल. जिल्ह्याला यावर्षी ४४० कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. यातील २४७ कोटी गाभा, तर १७१ कोटी बिगर गाभा क्षेत्राला मिळणार आहे. तसेच नाविण्यपूर्ण, शाश्वत विकास ध्येय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महिला व बालकल्याण आदी क्षेत्राला निधी मिळणार आहे. यावर्षी आतापर्यंत १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ४४ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच नवीन कामांचे ११ कोटी आणि दायित्वचे १३ कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यासोबतच डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत खामगाव, बुलढाणा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा या पाच तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून समाविष्ठ गावात अनुज्ञेय कामे करण्यात येणार आहे. यातून २५ टक्के निधी अंगणवाडीची कामे आणि २५ टक्के निधी शिक्षण वर्गखोली बांधकाम व दुरूस्तीसाठी राखीव निधी राहणार आहे. तसेच आदिवासी उपयोजनेतून १८ कोटी, तर १०० कोटी रूपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मिळणार आहे.
राज्य शासनाची महत्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातून ५ लाख महिलांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ३ लाख २१ हजार महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या अर्जांची आठ दिवसात छाननी करण्यात येणार आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ग्रामपंचायतीमधील सीएससीकडून अर्ज भरण्यात यावे. तसेच तालुकास्तरावर लवकरच समिती स्थापन करून अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या विविध विकासकामांना मान्यत्ाा देण्यात आली आहे. यामुळे जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा विषयक सुविधा? निर्माण होण्यास मदत मिळेल. याठिकाणी देण्यात आलेल्या सुविधांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.