SINDKHEDRAJA

निधी मंजूर होऊनही सिमेंट रस्ता करण्यास साखरखेर्डा ग्रामपंचायतीची टाळाटाळ!

– सामाजिक कार्यकर्ते गोपाल शिराळे यांची तक्रार

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०२३-२०२४ या वर्षासाठी साखरखेर्डा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सिमेंट रस्ता बांधण्यासाठी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतु, आतापर्यंत ११ महिने झाले तरी या रस्त्याचे काम झाले नसल्याने परिसरातील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते गोपाल रामसिंह शिराळे यांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारही दाखल केलेली आहे.

साखरखेर्डा येथील चर्मकार समाजासाठी शासनाने सिमेंट रस्ता मंजूर केलेला आहे. देवलाल कव्हळे यांच्या घरापासून ते राजू शिराळे यांच्या घरापर्यंत हा सिमेंट रस्ता आहे. त्यासाठी पाच लाख रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु, आजरोजी ११ महिने होऊन गेले तरी हा रस्ता तयार करण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी साधे वर्कऑर्डरही अद्याप काढलेली नाही. हा निधी वापरात आणला नाही तर तो परत जाऊ शकतो. तसे झाले तर हा चर्मकार समाजावर मोठा अन्याय ठरणार आहे. तरी या रस्त्याचे तातडीने काम करण्यात यावे, अशी मागणी गोपालसिंह रामसिंह शिराळे यांनी ग्रामपंचायतीकडे केलेली आहे. याबाबतचे लेखी निवेदनही त्यांनी ग्रामपंचायतीला दिलेले आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!