अनेक वर्षानंतर चिखली तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेवर काँग्रेसचा झेंडा!
बुलढाणा/चिखली (संजय निकाळजे) – चिखली तालुका खरेदी-विक्री संस्थेची अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणुक काल, दि.२२ जुलैरोजी बिनविरोध पार पडली असून, संचालक मंडळाची निवडणूक यापूर्वीच अविरोध झालेली आहे. चिखली तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेची निवडणूक अविरोध झाल्याने अनेक वर्षानंतर खरेदी-विक्री संघावर काँग्रेसचा तिरंगा फडकला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अबाधीत वर्चस्वानंतर आता तालुका खरेदी-विक्री संस्थाही राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात काँग्रेसच्याच ताब्यात आली आहे. त्यात ‘खविसं’च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ईश्वरराव इंगळे तर महायुतीचे राजू भगवानराव सावळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष ईश्वरराव इंगळे यांचा बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
चिखली तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थेची निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक अविरोधपणे पार पडावी म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह महाविकास आघाडी व सर्वपक्षीय नेत्यांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अविरोध निवडून आलेल्या संचालकामध्ये सर्वश्री काँग्रेसचे ईश्वर इंगळे, सौ. पुष्पाबाई शिवनारायण म्हस्के, पुरूषोत्तम हेलगे, किशोर आराख, शिवसेना (ठाकरे) प्रदीप वाघ, दामोधर येवले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय गाडेकर तर महायुतीचे राजू सावळे, कृष्णा साळोख, ज्योत्स्नाताई कणखर, संदीप म्हस्के, सखाराम सुरूशे, गजानन इंगळे यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह समस्त संचालक मंडळावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दि. चिखली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेचे निवडणूक अधिकारी म्हणून जी. जे. आमले यांनी व त्यांच्या सहकार्यांनी काम पाहिले. तर यावेळी कृबासचे माजी सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, माजी जि.प. सदस्य श्यामभाऊ पठाडे, पर्यावरण विभागचे विजय पाटील शेजोळ, शिवनारायण म्हस्के, अशोकराव मगर, रामधन मोरे, गणेश जवंजाळ, प्रल्हाद इंगळे, सदुनाना ठेंग, प्रकाश चव्हाण, संजय गिरी, शिवराज पाटील, आष्विन जाधव, विजू इंगळे, भारत मुलचंदानी, अजाबराव इंगळे, रामदास भगत यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर सातत्याने माजी आमदार राहुल बोंद्रे यांचेच निर्विवाद वर्चस्व राहिले हे उल्लेखनीय असून, मागील निवडणुकीत राहुलभाऊंनी महाविकास आघाडीला सोबत घेत बाजार समितीवर वर्चस्व मिळविले आहे. आता सहकारातील ही दुसरी महत्वाची संस्थादेखील राहुल बोंद्रेच्या ताब्यात आल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांची ताकद वाढत असल्याचे तसेच काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे बळदेखील वाढत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. सहकार क्षेत्रातील या निवडणुकींमुळे माजी आमदार राहुल बोंद्रे, शिवसेना (ठाकरे) प्रा.नरेंद्र खेडेकर, माजी आमदार धृपतराव सावळे, सौ.रेखाताई खेडेकर एकत्र आल्याने चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय बदल्याच्या भवितव्याची नांदी ठरू पाहत आहे.