साखरखेर्डा (विशेष प्रतिनिधी) – येथून जवळ असलेल्या तांदूळवाडी गावातील तरूणाने गोरेगाव फाट्याजवळ शेंदुर्जन रोडवर निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक २२ जुलैरोजी घडली. मृतकाचे नाव मनोहर जाधव, रा. तांदुळवाडी असे आहे. या तरूणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.
तांदुळवाडी येथील मनोहर भिवाजी जाधव (वय ३५) हा तरुण काम धंदे करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, परंतु काही दिवसापासून मनोहर जाधव हा तणावात वावरत होता. शिवाय, पत्नी व दोन लहान लहान मुलेसुद्धा जवळ नसल्यामुळे मनोहर जाधव हा नेहमीच एकांतात राहायचा, तरीसुद्धा त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला तणावातून मुक्त करण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु, ते प्रयत्न अपयशी ठरले. काल, २२ जुलैच्या रात्री १० वाजून १७ मिनिटांनी गोरेगाव फाट्याजवळ शेंदुर्जन रोडवर असलेल्या कडूनिंबाच्या झाडाला मनोहर जाधव याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार रामदास वैराळ यांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी मनोहर जाधव यांच्यावर तांदूळवाडी येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर जाधव यांच्या आई-वडिलांनी अगोदरच जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या मागे दोन भाऊ, पत्नी, दोन लहान मुले आहेत. पोलिसांनी प्रकरण मर्ग दाखल केले असून, पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास वैराळ हे करत आहेत.
———–