महसूल कर्मचार्याच्या संपानंतर आता तलाठी, मंडळ अधिकारी यांचीही आंदोलनाची हाक; कामे आणखी तुंबणार!
– तलाठी आस्थापना उपविभागीयस्तरावरच ठेवा; आ.रायमुलकर, आ.फुंडकर, आ.सौ.महालेंचे मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना पत्र
बुलढाणा (बाळू वानखेडे) – तलाठ्यांची जिल्ह्यास्तरावरील आस्थापना अन्यायकारक असून, सदर आस्थापना पूर्वीसारखीच उपविभागीय स्तरावर राहू द्यावी, यासह तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांनीही विविध मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर-२ जिल्हा शाखा बुलढाणाच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या (दि.२३ जुलै) जिल्ह्यातील तेराही तहसील कार्यालयासमोर आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी जिल्ह्यातील आ. डॉ. संजय रामुलकर, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. आंदोलनामुळे होणार्या गैरसोईबद्दल पटवारी संघटनेने शेतकर्यांची दिलगिरी व्यक्त केली असून, महसूल कर्मचार्यांच्या बेमुदत संपानंतर आता पटवारी व मंडळ अधिकारी यांनीही आंदोलनाची हाक दिल्याने तहसीलची विविध कामे आणखी तुंबणार आहेत.
तलाठी संवर्गातील प्रस्तावित अन्यायकारक बदल्यांबाबत तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांचे प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्यासाठी उद्या, दि. २३ जुलैरोजी विदर्भ पटवारी संघ शाखा नागपूर-२, जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यावतीने जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले आहे. तलाठी आस्थापना पूर्वीप्रमाणेच उपविभागीय स्तरावर राहू द्यावी, याबाबत संघटनेच्या मागणीवरून आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. आकाश फुंडकर व आ. सौ श्वेताताई महाले या सत्ताधारी आमदारांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्रदेखील दिले आहे. याच मागण्या घेऊन घेऊन पटवारी संघटना दि. २५ जुलैरोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून, दि. २६ जुलै रोजी तलाठी व मंडळ अधिकारी डीएससी तहसील कार्यालयात जमा करतील तर २९ जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. महसूल कर्मचार्यांच्या सुरू असलेल्या बेमुदत संपानंतर आता तलाठी, मंडळ अधिकारी यांनीही विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिल्याने शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह इतरांची तसेच प्रशासनाचीदेखील विविध कामे तुंबणार आहेत. आंदोलनामुळे होणार्या गैरसोईबद्दल पटवारी संघटनेने शेतकर्याची दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे.