वाढीव अनुदान व इतरप्रश्नी अंशतः अनुदानीत शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
– जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदानाचा शासनादेश तातडीने काढण्यात यावा, जानेवारी २०२४ पासून शिक्षकांना वाढीव वेतन अनुदान देण्यात यावे, आचारसंहितेअगोदर शिक्षकांच्या खात्यात एका महिन्याचा पगार जमा व्हावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा शिक्षक समन्वय संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (दि.२२) एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यामार्फत राज्य सरकारला शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी आंदोलक शिक्षकांशी संवाद साधून, याप्रश्नी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून, वाढीव अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू. तसेच, वाढीव अनुदानाचे वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
या निवेदनात नमूद आहे, की राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदानाचा शासन आदेशानुसार, एक जानेवारी २०२४ पासून शिक्षकांना वाढीव वेतन अनुदान देण्यात यावे, यासाठी शासनाने याच आठवड्यात आदेश काढावा, तसेच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर शिक्षकांच्या खात्यामध्ये एका महिन्याचा पगार लवकरात लवकर व्हावा, यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. तसेच १२-१५-२४ नुसार ज्या शाळांनी त्रुटी पूर्तता करून अनुदानास पात्र ठरलेले आहेत, त्या सर्व शाळांचे वाढीव अनुदान आदेश त्वरित निर्गमित करावेत, पुणे स्तरावर असलेल्या सर्व शाळांना अनुदानासाठी घोषित करून त्यांनासुद्धा लवकरात लवकर २० टक्के अनुदान देण्यात यावे, तसेच १५ मार्च २०२४ चा पटसंख्येचा शासन निर्णयातील अनिष्ट अटी व शर्ती रद्द करून सुधारित शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा, आदी मागण्या या निवेदनात नमूद आहेत. या आंदोलनाला जिल्हा मुख्याध्यापक संघ, मराठा सेवासंघ, विदर्भ माध्यमिक संघ, शिक्षक आघाडी, शिक्षक संघ, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजूभाऊ गायकवाड, संस्थाचालक महामंडळ यांनी जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनस्थळी आपली भूमिका स्पष्ट केली. विदर्भ माध्यमिक संघाचे अध्यक्ष देशमुख सर, शिवश्री राम बारोटे सर, मुख्याध्यापक महामंडळाचे शंकरराव पाटील घुगे, पाटील सर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवश्री सुनील जवंजाळ सर, पदवीधर संघटनेचे शिवश्री सपकाळ सर, अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी आंदोलनस्थळी मोबाईलच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार संजय गायकवाड यांनी समन्वय संघाच्या पदाधिकार्यांना आश्वस्त केले की, येणार्या आठवड्यामध्ये तुमच्या वाढीव अनुदानाचा आदेश काढण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो व लवकरात लवकर एका महिन्याचा पगार तुमच्या खात्यामध्ये कसा होईल, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अनुदान आदेश निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. मराठा सेवा संघाचे शिवश्री तुपकर सर, शिवश्री काळवाघे साहेब यांनी ठणकावून सांगितले की, एका आठवड्यात शासनादेश निर्गमीत झाला नाही तर मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल, व तुमचा आवाज शासन दरबारी पोहोचवेल. विदर्भ माध्यमिक संघाचे अध्यक्ष श्री देशमुख सर यांनी सदर बाब मी आमदार अडबाले साहेब यांच्या लक्षात आणून देऊन तुमच्या प्रश्नासाठी शासनाशी विचारविनिमय करण्यास भाग पाडतो व लवकरात लवकर वाढीव अनुदानाचा शासन आदेश निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगतो, असे आश्वासन दिले.जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे समन्वय शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी शासनाची भूमिका काय आहे ते शिक्षकांच्या समोर विषद केले. हे देणारे शासन आहे ते आपल्याला नक्की देणार याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच किलबिले सर, गजानन मिसाळ, उद्धव जाधव, प्रताप वायाळ, व इतर सर्व समन्वयक बंधू-भगिनी यांनी आपापल्या भूमिका विशद केल्या व मार्गदर्शन केले. येणार्या आठवड्यामध्ये शासन आदेश निर्गमित न झाल्यास बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठे भव्यदिव्य असे आंदोलन उभे करण्यात येईल, असे सर्व मान्यवरांनी ठणकावून सांगितले.