विधानसभेत काँग्रेसला ‘अच्छे दिन’?; राज्यात ७५ जागा जिंकण्याचा विश्वास!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा विश्वास बळावला असून, विधानसभेसाठी राज्यातील २८८ जागांचे सर्वेक्षण काँग्रेसकडून करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येण्यावर ठाम विश्वास असून, जवळजवळ ७५ जागा जिंकणार असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री कसा होईल, याबाबत रणनीतीदेखील आखली जात असल्याची राजकीय रणनीतीकारांची माहिती आहे, तर काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे धुमारे फुटत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्याने नेत्यांचा विश्वास आता आणखी बळावला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सदर निवडणुकी साठी राज्यातील २८८ विधानसभेच्या जागावर काँग्रेसकडून सर्वे करण्यात आल्याची विश्वासनीय माहिती हाती आली आहे. यामध्ये काँग्रेस ७५ जागा जिंकणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आतापासूनच जोरदार रणनीती आखली जात असल्याचीही विश्वासनीय माहिती आहे. असे असले तरी काँग्रेसला राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर ‘खेकडा वृत्तीला’ टाटा करत लोकसभेसारखेच ज्येष्ठ नेत्यांना गळ्यात गळा घालून एकदिलाने काम करावे लागणार आहे, हेसुद्धा तेवढेच खरे.
बुलढाण्यात जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा!
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मेहकर, चिखली व बुलढाणा या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. तथापि, महाविकास आघाडीच्या जागा वाटपांत यापैकी किती मतदारसंघ काँग्रेसला मिळतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मेहकर, बुलढाणा हे मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाला हवे असून, या मतदारसंघातून संयुक्त शिवसेनेत त्यांचे आमदार निवडून आले होते. परंतु, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे या मतदारसंघात प्रबळ उमेदवार नाहीत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची चौथी आघाडी महाविकास आघाडीसोबत आली तर बुलढाण्यातून तुपकर यांना जागा सुटू शकते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला आपला दावा सोडावा लागेल. तर मेहकरातून माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात हे शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून इच्छूक असून, ते ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. चिखलीतूनही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे इच्छूक असून, ही जागा तशी काँग्रेसची आहे व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झालेले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात जागा वाटपाचा मोठा पेच निर्माण होणार असल्याचे समोर आले आहे. रविकांत तुपकर यांनी सर्वच्या सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी, अद्याप बर्याच राजकीय घडामोडी बाकी असल्याने तुपकर हे आपल्या निर्णयावर कितपत ठाम राहतात, हादेखील प्रश्नच आहे. उलट तुपकरांनी स्वतःसह आपले उमेदवार उभे करावेत, अशी महायुतीच्या नेत्यांची तीव्र इच्छा असल्याचे दिसून येत आहे.
—————–