बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत जंगजग पछाडूनही ‘वन बुलढाणा मिशन’चे संस्थापक तथा शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांना आपले डिपॉजिटही वाचविता आले नाही. दरम्यान, आता संदीप शेळके यांनी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.२३) शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. आपण आता शिवसैनिक म्हणूनच काम करणार, असे त्यांनी सांगितले असले तरी, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘वन बुलढाणा मिशन’च्या नावाखाली संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचा एक रोडमॅप घेऊन लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सर्व जिल्हा पिंजून काढला, जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन गल्लीबोळात सभा घेऊन पटवून देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. जिल्ह्यातील विविध प्रलंबित, परंतु जनहिताचे प्रश्न जनतेच्या दरबारी लक्षात आणून दिले. जिल्ह्याच्या विकासात आताचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे कोणतेही योगदान राहिले नाही, असाही थेट आरोपही त्यांनी विविध सभांतून केला होता. परंतु एवढे करूनही संदीप शेळके यांना अवघे १३ हजार मते मिळाली. यापेक्षा जास्त मते नगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्या नगरसेवकाला सहज पडतात. म्हणजे सदर निवडणुकीत डिपॉजिटही वाचविणे खूप लांब राहिले होते. आता अचानक त्यांनी मुंबई येथे मंगळवारी (दि.२३) ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपण एक शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे शेळके यांनी यावेळी सांगितले. असे असले तरी त्यांनी नेमका प्रवेश कशासाठी केला, हे आगामी विधानसभा निवडणुकीत उजागर होईलच.