Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

रविकांत तुपकरांशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काडीमोड!

– पक्षाने त्यांना लालदिवा दिला, पद दिले, आता ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत – जालिंदर पाटील

पुणे (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काडीमोड घेतला आहे. तुपकर हे गत ३-४ वर्षांपासून पक्षाच्या एकाही आंदोलनाला आले नाहीत. उलट स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप केले. यामुळे यापुढे शेतकरी संघटना व तुपकर यांचा कोणताही संबंध नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी जाहीर केले. तुपकर हे स्वतःचा सुभा करत असताना आमचे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात कशाला हवे? असेही संघटनेने या प्रकरणी तुपकर यांना टोला हाणताना म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेपत, शिस्तभंग समितीने हा मोठा निर्णय घेतला.

Swabhimani Shetkari Sanghatana Dispute : राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी'तील वाद आणखी चिघळणार?-Ravikant Tupkar expressed his displeasure with Raju Shetty's role
राजू शेट्टी, रविकांत तुपकर.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद झाली. या परिषदेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकर यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा केली. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सतीश काकडे, घनशाम चौधरी, विठ्ठ्ल मोरे, अमरसिंह कदम, अनिल पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत शेतकर्‍यांच्या अडीअडचणींवरही चर्चा झाली. तसेच आगामी काळातील पक्षाची दिशाही ठरवण्यात आली. जालिंदर पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर यांनी नुकतीच पुण्यात एक बैठक घेतली. ही बैठक घेताना त्यांनी पक्ष प्रमुख राजू शेट्टी यांना विश्वासात घेतले नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून ते स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप करत आहेत. ही संघटना माझीच आहे अशाप्रकारे ते वागत आहेत. २६ सप्टेंबर २०१९ रोजीच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेत राजू शेट्टी याचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत. संघटनेचे नेते रविकात तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांना संघटेने लालदिवा दिला, पद दिले. एकदा पक्ष सोडला परत आले, काम करत राहिले. अलिकडे ते ऊस परिषदेस उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. शिस्तभंग समिती नेमली त्यांना पत्र दिले ते आले नाहीत. ते पक्ष राज्य कार्यकारणीला पण उपस्थितीत राहिले नाहीत. रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले. आता लोकसभेमध्येसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिले, तुपकर यांच्यामुळे चळवळीच नुकसान होत आहे, असे शिस्तपालन समितीने स्पष्ट केले आहे. गेल्या तीन चार वर्षात ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले नाहीत. ते नेतृत्वावर आणि पक्षावर प्रश्नचिन्ह उभे करत राहिले. त्यामुळे आजपासून आमच्या पक्षाचा आणि तुपकर यांचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत रविकांत तुपकर यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फारकत घेतली असल्याचे जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २२ वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जिवाचं रान केलं, त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून असा निर्णय धक्कादायक आहे. राजू शेट्टी आणि माझ्यामध्ये का दुरावा निर्माण झाला, हे मला माहिती नाही. कांदा आणि धानासाठी आंदोलन केले ही आमची चूक आहे का? असा सवाल करत राजू शेट्टी असा निर्णय घेतील असं मला अपेक्षित नव्हतं. २४ तारखेला आम्ही बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत पुढील निर्णय घेणार आहोत, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. आमचा पक्ष नोंदणीकृत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कष्टाने उभारण्यात आलेला पक्ष आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी त्यांचे काय नुकसान केले? हे त्यांनी सांगावे. रविकांत तुपकर पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात आले नाही. ते शेतकर्‍यांसाठी लढतात ही चांगली गोष्ट आहे. पण आता शेतकरी संघटना आणि रविकांत तुपकर यांचा संबंध संपलेला आहे. राज्यात १० शेतकरी संघटना असून, त्यात आणखी एका संघटनेची भर पडली एवढेच. तुपकर आतापर्यंत आमच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली, असे म्हणणार नाही. पण ते स्वतःचा सुभा करत असताना आमचे मंगळसूत्र त्यांचा गळ्यात कशासाठी पाहिजे? असेही जालिंदर पाटील म्हणाले.

रविकांत तुपकर गत ३-४ वर्षांपासून पक्षाच्या एकाही आंदोलनाला आले नाहीत. उलट स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप केले. यामुळे यापुढे शेतकरी संघटना व तुपकर यांचा कोणताही संबंध नाही.तुपकर स्वतःचा सुभा करत असताना आमचे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात कशाला हवे.
– जालिंदर पाटील, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना


तुपकरांनी बुधवारी पुण्यात बोलावली बैठक

दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी चळवळीतील पुढील आंदोलनात्मक व राजकीय दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी चळवळीतील प्रमुख महत्वाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक २४ जुलैला पुणे येथे आयोजित केली आहे. नवी पेठेतील एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह, येथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांसोबत विचार मंथन व चर्चा करून शेतकरी चळवळीची पुढील आंदोलनात्मक तसेच राजकीय दिशा ठरविली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी अपक्ष तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण राज्यातील सगळ्याच प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नुकतीच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!