साखरखेर्डा (अशोक इंगळे) – गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे, प्रेम, ममता माया, आपुलकी आणि सुख समृध्दीच्या मार्गाचा हा रस्ता आहे. ध्यान, साधना केली की मनाला शांती मिळते, त्यासाठी गुरु शिष्याचे नाते जुळले पाहिजे, असे प्रेरणादायी प्रतिपादन मठाचे मठाधीपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने केले.
यावेळी विचारपीठावर मठाधीपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज हे होते. त्यांनीही आपले विचार मांडले. सकाळी महास्वामी श्री पलसिध्द महाराज यांच्या मूर्तीचा रुद्राभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर समाधीस्थळ महापूजा आणि आरती करण्यात आली. दुपारी उपस्थित शिष्यांना गुरुमंत्र देण्यात आला. गुरुवर्यांचे आशीर्वादपर मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गोविंद रामानंद श्री प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी चार वाजता महाराज श्रींचा जलाभिषेक, नामजप, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता श्री प्रल्हाद महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश ज्योत टाकीत प्रवचन झाले. येथेही शेकडो भक्तांनी शिष्यत्व पत्करले. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रोकडोबा हनुमान मंदीरातही गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. पुरुषोत्तम महाराज चिंचोलकर यांनी शिष्यांना मार्गदर्शन केले. प्रसादाचे वाटप करण्यात आले.
———-