Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha
पोलिस पाटलांना ‘बिन पगारी, फुल अधिकारी’ म्हणण्याची वेळ!
बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांना सध्या ‘बिन पगारी, फुल अधिकारी’ म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण असे की, त्यांच्या बाबतीत एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, गेल्या एप्रिल २०२४ पासून त्यांना मानधनच मिळाले नाही. तर २०१२ पासून प्रवास भत्तादेखील मिळालेला नाही. या संदर्भात पोलीस पाटील संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षकांना यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा काही एक परिणाम झाला नाही.
राज्यात गाव-गाड्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून पोलीस पाटलांकडे बघितले जाते. गाव- खेड्यातील तथा परिसरातील घडलेल्या छोट्या-मोठ्या घटना, घडामोडी पोलीस स्टेशन पर्यंत कळविण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असते. वेळप्रसंगी छोटी- मोठी घटना घडल्यास ती गावातच कशी मिटवता येईल हा देखील त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.सद्यस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात ७०० चे आसपास पोलीस पाटील आहेत. तर जवळपास ५० टक्के पोलीस पाटलांची पद ही रिक्त आहेत. त्यातच रिक्त पदांचे ग्रहण असल्यामुळे एका पोलीस पाटलाकडे स्वतःच्या गावासह इतरही दोन- तीन गावाचा पदभार दिलेला आहे. असे असताना एप्रिल २०२४ पर्यंत पोलीस पाटलांना ६ हजार पाचशे एवढे अल्प मानधन मिळत होते. मात्र राज्य सरकारने ते वाढवून एप्रिल २०२४ पासून पोलीस पाटलांचं मानधन हे १५ हजार रुपये एवढे दुप्पट केले आहे. मात्र तेव्हापासून ते देखील मिळाले नाही. तसेच २०१२ पासून त्यांना प्रवास भत्ता देखील देण्यात आलेला नाही. ह्या संदर्भात जिल्हाधिकारी बुलढाणा, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे मानधनासाठी पाठपुरावा केला. मात्र त्याचे दखल कोणाकडूनही अध्यापर्यंत घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस पाटील आर्थिक सापडला असून त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील गेल्या एप्रिल महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहे.त्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील पोलीस पाटलांना सहा महिन्यांपासून ‘बिन पगारी, फुल अधिकारी’ बोलण्याची वेळ आली आहे. मानधन थकीत असल्यामुळे पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागतो आहे. राज्यातल्या गावखेड्यात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील हे एक महत्वाचे पद असून प्रथमिक पातळीवर पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात. राज्यात सध्या घडीला एकूण ३७ हजार पोलीस पाटील आहेत. तर दुसरीकडे जवळपास ८ हजार पद रिक्त असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस पाटलांचे गेल्या पाच महिन्यांचे प्रत्येकी ५८ हजार अडकलेले असल्याने पोलीस पाटील मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकार नेमकं कधी वेतन देणार याची पोलीस पाटलांना प्रतिक्षा लागली आहे.
—
मानधनासह प्रवास भत्ता ही नाही!
सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात एप्रिल २०२४ पासून वाढ केली आहे. मात्र त्या वाढीव मानधनाचा काही फायदा झाला नसून तेव्हापासून मानधनच मिळाले नाही. त्याचप्रमाणे २०१२ पासून प्रवास भत्ता ही देखील कोणत्याच पोलीस पाटलांना देण्यात आला नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना पत्र दिले मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस पाटील आर्थिक संकटात जीवन जगत असून उपासमारीची वेळ आली आहे.
– नंदकिशोर बाहेकर,अध्यक्ष पोलीस पाटील संघटना, चिखली